२२ दिवस बसून काढले, मग त्यांच्या झाल्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:10+5:302020-12-08T04:21:10+5:30
कोल्हापूर : काहीच काम नसल्यामुळे तब्बल बावीस दिवस बसून काढल्यानंतर महानगरपालिकेतील नगरसचिव कार्यालयाकडील ३१ कर्मचाऱ्यांच्या सोमवारी अन्य विभागांत बदल्या ...
कोल्हापूर : काहीच काम नसल्यामुळे तब्बल बावीस दिवस बसून काढल्यानंतर महानगरपालिकेतील नगरसचिव कार्यालयाकडील ३१ कर्मचाऱ्यांच्या सोमवारी अन्य विभागांत बदल्या झाल्या. महापालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपली, तेव्हापासून हे कर्मचारी नुसते बसून हाेते, बदल्यांच्या प्रतीक्षेत होते. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी त्यांच्या बदल्यांच्या आदेशावर सोमवारी सही केली.
महापौरांच्या नियंत्रणाखाली महानगरपालिकेतील नगरसचिव कार्यालयाचा कारभार चालत असतो. लोकनियुक्त सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपली. त्यामुळे महापौर, उपमहापौरांच्यासह प्रमुख पदाधिकारी, आघाडी कार्यालये बंद झाली. या कार्यालयात नियुक्त असलेल्या ३१ कर्मचाऱ्यांना काहीच काम राहिले नाही. नवीन सभागृह अस्तित्वात यायला पुढील किमान सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी नगरसचिव कार्यालयाकडील आवश्यक कर्मचारीवगळता अन्य सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या अन्य विभागांत करण्याचा निर्णय घेतला होता. नगरसचिव तसेच कामगार अधिकाऱ्यांना या सर्व कर्मचाऱ्यांची यादी बनविण्यास सांगितले होते, तशी यादीही तयार करण्यात आली.
परंतु बदल्यांच्या आदेशावर सही करण्यास प्रशासकांकडून विलंब झाला. त्यामुळे तब्बल बावीस दिवस ३१ कर्मचारी अक्षरश: बसून होते. ते महापालिकेत यायचे काही वेळ थांबायचे आणि निघूनही जायचे. संध्याकाळी हजेरीसाठी परत यायचे. सोमवारी बलकवडे यांनी या बदल्यांच्या आदेशावर सही केली. त्यानंतर तातडीने त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगण्यात आले.
वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, मुकादम कम क्लार्क, शिपाई, झाडू कामगार,पहारेकरी या दर्जाचे हे कर्मचारी आहेत. त्यांच्या बदल्या घरफाळा, आस्थापना, इस्टेट, पाणीपुरवठा, जनसंपर्क विभागाकडे करण्यात आल्या आहेत. आज, मंगळवारी सर्व कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर होणार आहेत.