‘ते’ धमकीपत्र मंगळवार पेठ पोस्टातून
By admin | Published: April 26, 2016 12:14 AM2016-04-26T00:14:35+5:302016-04-26T00:14:35+5:30
पोलिस अधीक्षक : स्थानिक व्यक्तीचे कृत्य असण्याची शक्यता
कोल्हापूर : येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना निनावी धमकी पत्रापाठोपाठ अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिलेली धमकी हे स्थानिक व्यक्तीचे कृत्य असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. देसाई यांना आलेले पत्र हे जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील मंगळवार पेठ पोस्टातून आल्याचे निष्पन्न झाले आहे. लवकरच आम्ही या घटनेमागच्या सूत्रधारास अटक करू, असे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
देसाई यांना ‘सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करू नका. आमच्या तीन गोळ््यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा. नशिबाने एक देसाई वाचली, दुसऱ्या देसाई यांचे नशीब साथ देईलच असे नाही,’ या आशयाचे धमकीचे निनावी पत्र आल्याने खळबळ उडाली. या पत्राची वरिष्ठ पातळीवर गोपनीय चौकशी सुरू असतानाच त्यांच्या कार्यालयातील लँडलाईन नंबरवर फोन आला. ‘मी आॅस्ट्रेलियातून रवी पुजारी बोलतोय, ‘अंबाबाई’च्या मंदिरातील पुजाऱ्यांच्या जिवावर उठलाय तुम्ही, हे थांबवा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकी दिली. पोलिस प्रशासनाने या धमकीची गांभीर्याने दखल घेत फोन कुठून आला, त्याची माहिती सायबर सेलकडून घेण्याचा प्रयत्न केला. देसाई यांचे दोन्हीही नंबर बीएसएनएलचे असल्याने सायबर सेलने भारत संचार निगम (बीएसएनएल) विभागाच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून देसाई यांच्या लँडलाईन नंबरच्या कॉल डिटेल्सची माहिती मागविली. सोमवारी रात्री त्याचे डिटेल्स पोलिस अधीक्षक देशपांडे यांच्या हाती मिळाले.
देसाई यांना आलेले पत्र मंगळवार पेठेतील पोस्ट कार्यालयातून आले आहे. त्यामुळे या पोस्ट कार्यालयाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज पोलिस बारकाईने तपासत आहेत. ‘सनातन’ व हिंदुत्ववादी संघटनेचे काही साधकही पोलिसांच्या रडावर आहेत. देसाई यांनी प्रसिद्ध केलेल्या अंबाबाईच्या पुस्तकावरून कोणी दुखावले असण्याची शक्यता आहे. तृप्ती देसाई यांच्या गाभार प्रवेश वादानंतरच देसाई यांना धमकी आली. त्यामुळे सर्व बाजूंनी व अत्यंत अभ्यासपूर्ण या प्रकरणी तपास सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये स्थानिक व्यक्तीचे हे कृत्य असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस कसोशीने तपास करत आहेत. देसाई यांच्या कार्यालय व साळोखेनगर येथील निवासस्थानी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. परिसरातही साध्या वेशात पोलिसांचे पथक टेहाळणी करत असल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.