त्यांनी चक्क कोविड योद्ध्या परिचारिकांनाच बांधल्या राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:06+5:302021-08-23T04:26:06+5:30
कोल्हापूर : रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ हा रक्षणकर्ता मानून त्याला राखी बांधण्याची प्रथा आहे. पण सीपीआरमधील कोविड अतिदक्षता विभागात रात्रंदिवस ...
कोल्हापूर : रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ हा रक्षणकर्ता मानून त्याला राखी बांधण्याची प्रथा आहे. पण सीपीआरमधील कोविड अतिदक्षता विभागात रात्रंदिवस काम करणाऱ्या परजिल्ह्यातील परिचारिकांनी अनेक भावांची सेवा करत त्यांना जीवनदान दिले. या त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रामेश्वर पतकी व त्यांच्या मित्रमंडळींनी रविवारी या परिचारिकांनाच राख्या बांधून त्यांचा सन्मान केला.
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या परजिल्ह्यातील परिचारिका आई, वडील, भाऊ, मुलगा आदी नातेवाईकांपासून दूर राहात आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग येथील परिचारिकांचा समावेश आहे. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी पतकी यांनी मित्रमंडळींसह कोविड अतिदक्षता विभागात जाऊन या परिचारिकांना राख्या बांधून व मिठाई भरवून त्यांचा अनोखा सन्मान केला. अनन्या ओझा, स्वाती गायकवाड, धनश्री चेचर, पूजा मस्के, मयुरी पाटील यांना राख्या बांधताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. या कार्यक्रमाचे संयोजन सतीश पोवार, अंकुश देशपांडे, संग्राम जाधव यांनी केले.
फोटो : २२०८२०२१-कोल-सीपीआर
ओळी : सीपीआर रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागातील परिचारिकांना रविवारी रामेश्वर पतकी व त्यांच्या मित्रमंडळींनी राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.