प्लास्टिकच्या टिमक्यांचा कडकडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 12:34 AM2017-03-11T00:34:57+5:302017-03-11T00:34:57+5:30
होळीचा जल्लोष : चमड्यांचे कारखाने बंद, बाजारात पारंपरिक टिमक्यांची संख्या घटली
इंदूमती गणेश--कोल्हापूरहोळीला वाजविल्या जाणाऱ्या टिमक्यांच्या टिमटिमाटाची जागा आता प्लास्टिकच्या ढोल-ताशांच्या कडकडाटाने घेतली आहे. चामड्याची अनुपलब्धता, बंद झालेले चामड्याचे कारखाने आणि वाढलेल्या दराचा परिणाम म्हणून बाजारात टिमक्यांची संख्या घटली आहे. मराठी महिन्यातील शेवटचा सण म्हणून होळीला विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू होतो असे म्हणतात. त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी असते. होळीदिवशी घरोघरी पुरणाची पोळी केली जाते. संध्याकाळी दारात, गल्ली-बोळांमध्ये, कॉलन्यांमध्ये होळी पेटविली जाते. होळीदिवशी टिमकी वाजविण्याला विशेष महत्त्व आहे. होळीभोवती बोंबलू नका रे म्हणत गोल फिरताना ही टिमकी वाजविण्याची पारंपरिक पद्धत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या चामड्यांच्या टिमक्यांची जागा प्लास्टिकच्या ढोल आणि ताशांनी घेतली आहे.
प्राण्यांचे चामडे आता मिळत नाही. तशातच आता कोल्हापुरातील कारखानेही बंद झाल्याने टिमक्यांची निर्मितीदेखील घटली आहे. काही मोजक्या कुटुंबांकडूनच टिमक्या बनविल्या जातात. त्यांचा दरही जास्त असतो. त्यामुळे व्यावसायिकांकडून प्लास्टिकच्या ढोल-ताशांची विक्री केली जाते. गुजरातहून प्लास्टिक, फायबर मागवून त्यांच्यापासून ताशा आणि ढोल बनविले जातात. टिमक्यांच्या तुलनेत ते जास्त टिकतात; त्यामुळे नागरिकांकडूनही याच ढोल-ताशांना अधिक मागणी आहे.
प्रदूषणामुळे कारखाने बंद
टिमक्या बनविण्याचे काम वीरशैव कक्कय्या समाजाकडून केले जाते. हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. पूर्वी हे लोक रविवार पेठेत राहायचे. मात्र या व्यवसायामुळे सुटणाऱ्या दुर्गंधीच्या कारणास्तव त्यांना जवाहरनगर परिसरात जागा देण्यात आली. येथे चामड्याचे जवळपास ५० ते ६० कारखाने होते. ते पाण्यासह अन्य प्रदूषणाच्या कारणास्तव महापालिकेकडून बंद करण्यात आले. प्लास्टिकचे ढोल-ताशे अन्य व्यावसायिकांकडूनही विकले जात असल्याने आता या समाजाला या व्यवसायातून मिळणारे उत्पन्नही कमी झाले आहे.
चामड्यापासून ढोल, टिमक्या, बॅगा अशा वस्तू बनविण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय होता. आता कारखाने बंद झाल्याने रोजगारासाठी अन्य ठिकाणी जावे लागते. होळीच्या आठ दिवसांत टिमक्यांऐवजी प्लास्टिकचे ढोल-ताशे विकून व्यवसाय चालवितो.
- कल्पना कदम, व्यावसायिक