म्हाकवेतील शाळेत चोरीच्या नावाखाली कागदपत्रांवर डल्ला?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 08:19 PM2023-02-10T20:19:41+5:302023-02-10T20:19:48+5:30
याबाबत कागल पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे
दत्ता पाटील
म्हाकवे : म्हाकवे (ता.कागल) येथील म्हाकवे इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेत गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी कडी कुलूप तोडून कागदपत्रांच्या चोरीचा प्रयत्न केला आहे. यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत कागल पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे
याबाबत अधिक माहिती अशी, चोरट्यांनी मुख्याध्यापकांच्या रुमसह प्रयोगशाळा, संगणक कक्ष व स्टाफरुम या चार शाळा खोल्यांचा कडी कोंयडा तोडून कागदपत्रे गायब करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयोगशाळेतील साहित्य विस्कटून टाकण्यात आले आहे. तर यातील काही साहित्य शाळेच्या व्हरांड्यामध्ये आणून टाकण्यात आले आहे.
पोलिसांनी श्वानपथक मागवले होते या श्वानाने शाळेच्या बाहेरून मुख्य रस्त्यावर मार्ग दाखविला व तेथेच ते घोटमाळले. त्यामुळे माग काढता आला नाही.तर ठसे तज्ञांमार्फत ठसे घेण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्याध्यापकांच्या खोलीतील महत्त्वाची कागदपत्रे गायब केल्याची चर्चा आहे. याबाबतची फिर्याद मुख्याध्यापक पी.बी. भारमल यांनी कागल पोलिसात दिली आहे. कागल पोलीस अधिक तपास करत आहेत.
कागदपञांचीच चोरी झाली असावी?
शाळेत रोख रक्कम नसतेच शिवाय संगणक कक्षात दोन ते अडीच लाखांहून अधिक किंमतीचे साहित्य असताना त्याला हातही लावलेला नाही.तसेच, तिजोरीतील महागडे साहित्यही गायब झालेले नाही.त्यामुळे अनेक वर्षांपासून या संस्थेत वाद प्रतिवाद सुरू आहेत.त्यातुनच हा प्रकार झाला आहे कि काय अशी घटनास्थळी उलटसुलट चर्चा सुरू होती.