सेवा रुग्णालयातील सीसीटीव्हीलाही चोरांचा चकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:46 AM2020-12-17T04:46:59+5:302020-12-17T04:46:59+5:30
दीपक जाधव कदमवाडी : वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बावड्यातील सेवा रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावले खरे, मात्र चोरांनी ...
दीपक जाधव
कदमवाडी : वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बावड्यातील सेवा रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावले खरे, मात्र चोरांनी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यालाही चकवा देत आपले कारनामे सुरूच ठेवल्याने रुग्णालय प्रशासन हतबल झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सेवा रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे साहित्य चोरीला जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही असूनही चोरीला आळा बसत नसल्याने चोरांना पकडणे नवे आव्हान बनले आहे. विशेष म्हणजे जिथे चोरी होते, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद होत नसल्याचे चोरट्याची हातचलाखी अचंबित करणारी आहे.
सेवा रुग्णालय हे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आहे. त्यामुळे येथे रुग्णांची मोठी गर्दी असते. त्यातच सीपीआर पूर्ण क्षमतेने चालू नसल्याने तेथील रुग्णही याच रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. सध्या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागासह अंतर रुग्ण विभागाही फुल्ल आहे. रुग्णालयात ४५ खाटांची सोय असूनही गेल्या काही महिन्यांपासून अंतर रुग्ण हे ६०‐७० च्यावर दाखल होत आहेत. रुग्णालयातील वाढती गर्दी लक्षात घेत सुरक्षेसाठी प्रशासनाने रुग्णालय आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथे भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयात येणारे रुग्ण व नातेवाईक यांच्या साहित्याची चोरी होत असल्याने सेवा रुग्णालय सुरक्षित नसल्याची भावना रुग्णांमध्ये होत आहे. आपले साहित्य सुरक्षिततेसाठी ठेवायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत चारवेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. जिथे चोरी झाली, तेथे सीसीटीव्ही असूनही चोरटा त्यात कैद होत नसल्याने तो माहीतगार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चौकट :
सेवा रुग्णालयातील चोरीच्या घटना नव्या नाहीत. तीन वर्षांपूर्वी एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यावर अंतररुग्ण विभागात उपचार सुरू असताना त्यांचा मोबाईलही चोरट्यांनी लांबविला होता.