दानोळी येथे कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी दाम्पत्यास केली मारहाण, दीड तोळे सोने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:10 AM2024-04-02T11:10:52+5:302024-04-02T11:13:38+5:30
रोहित तवंदकर दानोळी : कोयता गळ्यावर ठेऊन चोरट्यांनी दानोळी ता. येथील कारंडे दापत्यास मारहाण करून अंदाजे दीड तोळे सोने ...
रोहित तवंदकर
दानोळी : कोयता गळ्यावर ठेऊन चोरट्यांनी दानोळी ता. येथील कारंडे दापत्यास मारहाण करून अंदाजे दीड तोळे सोने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. दानोळी-उमळवाड रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यालगत असणाऱ्या शेतात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, येथील मारूती मल्हारी कारंडे यांचे उमळवाड रोडवरील पहिला ओढा परिसरात जनावरांचा गोठा व शेड आहे. दररोज रात्री मारूती व पत्नी प्रतिभा हे शेतावर वस्तीला असतात. नेहमी प्रमाणे ते वस्तीला गेले होते. यावेळी पहाटे दारावर बाहेरून लाथ मारुन तीन चोरट्यांनी आत प्रवेश केला. दोघा पती पत्नीला बेदम मारहाण केली व दोघांच्या गळ्याला कोयता लाऊन प्रतिभा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, पैजण, जोडवी, कानातील वेलफुले असा अंदाजे दीड तोळ्यांचे ऐवज व मारूती यांचा मोबाईल व दुचाकीची चावी घेऊन चोरटे पसार झाले.
जाताना चोरट्यांनी दापत्यास एका खोलीत कोंडून बाहेरून कडी लावली होती. ही माहिती गावात समजताच यात्रा समितीने भेट देऊन माहिती घेतली. पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. तर कारंडे दापत्यावर दानोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.