कोल्हापुरात शिवाजी पेठेत चोरट्यांनी भरदिवसा फ्लॅट फोडला, साडेतीन तोळे दागिने लंपास
By उद्धव गोडसे | Published: March 13, 2024 01:50 PM2024-03-13T13:50:34+5:302024-03-13T13:51:21+5:30
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर दोन चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी केल्याचे स्पष्ट झाले
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील सरनाईक कॉलनीत शुक्रतारा हाईट्समधील एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी एक लाख १५ हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळ्यांचे दागिने लंपास केले. याच इमारतीमधील दुसरा फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न करून चोरटे पळाले. याबाबत अनिता अनिल काशीकर (वय ६५, रा. शुक्रतारा हाईट्स, शिवाजी पेठ) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी (दि. १२) दुपारी दीड ते सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी फिर्यादी काशीकर काही कामानिमित्त फ्लॅट बंद करून बाहेर गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या ३०४ क्रमांकाच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता, गेस्ट रुममधील कपाटातील सोन्याचा हार, कानातील कुड्या, सोन्याचे मणी आणि तुकडे असा साडेतीन तोळ्यांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर दोन चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी केल्याचे स्पष्ट झाले. काळा टी शर्ट आणि पांढरा टी शर्ट घातलेले अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील दोन चोरटे फुटेजमध्ये दिसत आहेत. याच चोरट्यांनी ६०४ क्रमांकाच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचा उल्लेख काशीकर यांनी फिर्यादीत केला आहे.