चोरट्याने लिहिलं 'या बंगल्यातील लोक भिकारी', कोल्हापुरात या चोरीची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 01:16 PM2022-02-08T13:16:24+5:302022-02-08T13:42:25+5:30
इतक्या मोठ्या बंगल्यात मोठा ऐवज मिळेल, अशी चोरट्यांना आशा होती. मात्र, त्याचा भ्रमनिरास झाला
कोल्हापूर : आर.के.नगरातील एक आलिशान बंगला चोरट्यांनी फोडला. यात ७ हजारांची रोकड व ३० हजारांचे दागिने चोरीस गेले. मोठ्या बंगल्यात किरकोळ ऐवज सापडल्याने चिडलेल्या चोरट्याने 'या बंगल्यातील लोक भिकारी आहेत,' असे खडूने भिंतीवर लिहून तो निघून गेला. या चोरीची परिसरात खुमासदार चर्चा सुरू आहे.
मुले नोकरीनिमित्त मोठ्या शहरात राहतात. त्यामुळे वृद्ध जोडपे आर. के. नगरात आलिशान बंगल्यात राहत होते. दोन दिवसांपूर्वी ते कागल तालुक्यातील आपल्या मूळ गावी गेले होते. या दरम्यान त्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्याने सर्वच खोल्यांतील कपाटे उचकटून साहित्य विस्कटले. यात चोरट्यांच्या हाती केवळ सात हजारांची रोकड व ३० हजारांचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लागला.
इतक्या मोठ्या बंगल्यात मोठा ऐवज मिळेल, अशी चोरट्यांना आशा होती. मात्र, त्याचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे चिडलेल्या चोरट्याने जाताना बंगल्याच्या भिंतीवर ‘या बंगल्यातील लोक भिकारी आहेत,' असे खडूने लिहिले. घर मालक आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी भिंतीवर लिहिलेला मजकूर पाहिला. तेव्हा त्यांना चोरट्यांच्या या कृतीवर हसावे की राग करावा, अशी भावना त्यांनी पोलिसांत तक्रार करताना व्यक्त केली. या चोरीपेक्षा भिंतीवर लिहून ठेवलेल्या मजकुराचीच चर्चा परिसरात अजून सुरूच आहे.