Kolhapur: फॅन, टीव्ही, सिलिंडर, कपडे... चोरट्यांनी हाती लागेल ते लंपास केले
By उद्धव गोडसे | Published: April 23, 2024 12:49 PM2024-04-23T12:49:55+5:302024-04-23T12:50:11+5:30
कोल्हापूर : कसबा बावडा येथील अंडी उबवणी केंद्राचे बंद कार्यालय आणि कदमवाडीतील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या प्राचार्यांचे निवासस्थान चोरट्यांनी ...
कोल्हापूर : कसबा बावडा येथील अंडी उबवणी केंद्राचे बंद कार्यालय आणि कदमवाडीतील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या प्राचार्यांचे निवासस्थान चोरट्यांनी फोडले. शनिवारी (दि. २०) रात्री ते सोमवारी (दि. २२) पहाटेच्या दरम्यान झालेल्या चोरीत चोरट्यांनी फॅन, टीव्ही, लॅपटॉप, प्रिंटर, गॅस सिलिंडर, कपडे असे हाताला लागेल ते सुमारे ९० हजारांचे साहित्य लंपास केले. यावरून चोरट्यांनी बंद घरे आणि कार्यालये पुन्हा टार्गेट केल्याचे दिसत आहे.
शाहूपुरी पोलिसांकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील अंडी उबवणी केंद्रात सोमवारी सकाळी कर्मचारी पोहोचल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी कार्यालयाचा दरवाजा उचकटून आतील तीन संगणक संच, तीन प्रिंटर, एक टेबल फॅन, एक लॅपटॉप, इन्व्हर्टर व बॅटरी असे सुमारे ६१ हजारांचे साहित्य लंपास केले. याबाबत कार्यालयातील अधिकारी डॉ. वर्षा शिवाजी मिंड (वय ३४, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, कदमवाडी येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या परिसरातील प्राचार्यांचे बंद निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत लक्ष्मण ज्ञानदेव कदम (वय ५९, रा. शाहू कॉलेज, कदमवाडी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्यांनी घरातील एक गॅस सिलिंडर, पंखा, इन्व्हर्टर आणि बॅटरी आणि कपाटातील कपडे असा ३० हजारांचा मुद्देमाल लांबवल्याचा उल्लेख कदम यांनी फिर्यादीत केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.