चोरट्यांनी लंपास केले चक्क दोन लाखाचे डिझेल, वाढत्या दराचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:53 PM2018-09-08T13:53:23+5:302018-09-08T14:25:55+5:30
पेट्रोल आणि डिझेलने उच्चांकी दर गाठल्यामुळे असेल कदाचीत पण मौल्यवान दागिने आणि रोकड चोरीऐवजी चोरट्यांनी आपला मोर्चा चक्क पेट्रोल आणि डिझेल चोरीकडे वळविल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत अनेक किंमती साहित्याची किंवा मौल्यवान दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार आली होती, परंतु चक्क डिझेल चोरीची ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच तक्रार आहे.
कोल्हापूर : गेल्या आठवड्यातील पोलिस ठाण्यात आलेल्या एका अनोख्या तक्रारीमुळे पोलिस खाते चक्रावून गेले आहे. दागदागिने, घरफोडी, इतकेच नव्हे तर संगणकांच्या मदतीने एटीममधील रक्कम काढण्याच्या सायबर गुन्ह्याच्या तपासाऐवजी चक्क डिझेलच्या चोरीचा तपास करण्याची वेळ ग्रामीण पोलिसांवर आली आहे.
पेट्रोल आणि डिझेलने उच्चांकी दर गाठल्यामुळे असेल कदाचीत पण मौल्यवान दागिने आणि रोकड चोरीऐवजी चोरट्यांनी आपला मोर्चा चक्क पेट्रोल आणि डिझेल चोरीकडे वळविल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत अनेक किंमती साहित्याची किंवा मौल्यवान दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार आली होती, परंतु चक्क डिझेल चोरीची ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच तक्रार आहे.
गेल्या आठवड्यातच अज्ञात चोरट्यांनी १ लाख ५३ हजार रुपये किमंतीचे २0६८ लीटरचे डिझेल चोरीला गेल्याची तक्रार राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथून आल्याने पोलिस चक्रावून गेले आहेत.
राधानगरी तालुक्यातील तुरंबे या गावातील पेट्रोल पंपावरुन ही चोरी झाली असून राधानगरी पोलिसांत यासंदर्भात तक्रार नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश शांतीलाल निल्ले (वय ४८, रा. राधानगरी) यांचा तुरंबे येथे पेट्रोल पंप आहे. रविवारी सकाळी कर्मछारी डिझेलचा हिशेब घेताना टाकीतील डिझेलच्या साठ्यात तफावत असल्याचे निदर्शनास आले.
१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आपल्या पेट्रोलपंपांचे कार्यालय बंद करुन निल्ले घरी गेले. सकाळी नेहमीप्रमाणे ते पेट्रोलपंपावर आले, तेव्हा अज्ञातांनी जमिनीखालील पंपाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पंपाला जोडलेले लोखंडी खांबही तोडल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी पंपातील डिझेलच्या साठ्याची तपासणी केली असता त्यात तफावत असल्याचे निदर्शनास आले. पंपातील १ लाख ५३ हजार रुपये किमंतीचे २0६८ लीटर डिझेलची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी प्रतिलीटर ७४.३७ रुपये इतका डिझेलचा दर होता.
निल्ले यांनी बारकाईने पाहणी केली तेव्हा शेतवडीत डिझेल सांडल्याचे आणि वाहनांच्या टायरच्या खुणाही आढळल्या. रात्री बनावट किल्लीचा वापर करुन टाकीत पाईप टाकून हे डिझेल काढल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री पंपावर काही कर्मचारी मुक्कामी होते, त्यांना काही आवाज आल्याने त्यांनी उठून पाहिलेही, परंतु त्यांना कोणी न दिसल्याने ते पुन्हा झोपी गेले. या पेट्रोल पंपावर अनेक दिवसांपासून एक कुत्रे राखणीला होते. ते रात्री कोणालाही या परिसरात येउ देत नव्हते, पण पंधरा दिवसांपासून ते अचानक गायब झाले. चोरट्यांनीच टेहळणी करुन त्याला ठार मारल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मूळात हा पंप गावाच्या थोडा बाहेर आहे. तेथे सुरक्षारक्षकही नेमलेला नव्हता आणि सीसीटीव्ही कॅमेराही बसवलेला नव्हता. राधानगरी गावाकडे जाणारा छोटा रस्ता येथूनच जातो. परंतु रात्रीच्यावेळी येथे फारशी रहदारी नसते. याचाच फायदा चोरट्यांनी उठवला असावा. निल्ले यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली. या अनोख्या चोरीची तक्रार ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत.