१५०० कलिंगडांवर चोरट्यांनी मारला डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:22 AM2021-05-15T04:22:27+5:302021-05-15T04:22:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बाजारभोगाव : शेतात केलेल्या कलिंगडांच्या प्लाॅटमधून सत्तर हजार रुपये किमतीची सुमारे १५०० कलिंगडांचे नग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बाजारभोगाव : शेतात केलेल्या कलिंगडांच्या प्लाॅटमधून सत्तर हजार रुपये किमतीची सुमारे १५०० कलिंगडांचे नग अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना पाटपन्हाळा (ता. पन्हाळा) येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राकेश रामचंद्र पाटील, रा. पाटपन्हाळा यांच्या फिर्यादीनुसार कळे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पाटपन्हाळा येथील राकेश रामचंद्र पाटील हे युवा शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून चांगल्या पद्धतीने शेती करतात. गेले दोन-तीन वर्षांपासून कलिंगडाची शेती करून त्यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे. कासारी नदीकाठी असलेल्या रिगडी नावाच्या शेतातील गट क्र. -४४० मधील एक एकर क्षेत्रात मार्चमध्ये मेलोडी काळापट्टा जातीचे कलिंगड व मिरची पिकाची लागवड केली होती.
राकेश पाटील यांनी सोमवारी कलिंगड पिकावर औषध फवारणी केली. बुधवारी दुपारनंतर शेतात आले असता दोघे तरुण कलिंगड शेतातून घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांचा पाठलाग केला असता कासारी नदीत पाणी नसल्याने नदीतून ते माळापुडे गावाकडे पळून गेले. कलिंगड फळे परिपक्व अवस्थेत असल्याने येत्या दोन दिवसांत काढणेचे नियोजन होते; परंतु गुरुवारी सकाळी प्लाॅटमधील दोन ते अडीच किलोची सर्व फळे चोरल्याचा प्रकार उघडकीस आला.