Kolhapur: चोरट्यांनी काजू फँक्टरी फोडली, साडेपाच लाखांचा काजूगर लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 01:31 PM2024-01-27T13:31:40+5:302024-01-27T13:33:07+5:30
सुनिल चौगले आमजाई व्हरवडे : राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे येथील काजू प्रक्रिया फँक्टरीचे पत्रे फोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये ...
सुनिल चौगले
आमजाई व्हरवडे : राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे येथील काजू प्रक्रिया फँक्टरीचे पत्रे फोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये किंमतीचा काजूगर लंपास केला. गेल्या काही दिवसापासून काजू कारखान्यावर चोरीचे प्रकार वाढले असून अशी काजूगर चोरणारी टोळीच असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, भोगावती राधानगरी राज्यमार्गावर आमजाई व्हरवडे येथे अनिकेत यशवंत चौगले यांचा महालक्ष्मी काजू प्रक्रिया कारखाना आहे. गुरुवारी (दि.२५) रात्री कारखाना बंद करुन ते घरी आले. शुक्रवारी पहाटे परत कारखान्यात गेले असता कारखान्याचे पत्रे उचकटलेले व दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. आत जाऊन बघितले असता पाच लाख रुपये किंमतीचा सातशे किलो काजूगर व बारा हजार रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. शिवाय चोरट्यानी सीसीटीव्हीचे माँनिटर व स्किनही लंपास केली. घटनास्थळाचा पंचनामा करुन राधानगरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
गेल्या पंधरा दिवसात चौथी घटना
बेरोजगार तरुण लाखो रुपयांचे कर्ज काढून काजू प्रक्रिया उद्योग करत आहेत. पण गेल्या पंधरा दिवसात चार कारखान्यावर चोरीची ही चौथी घटना आहे. यामुळे काजूगर चोरणारी टोळीच असण्याची शक्यता असल्यामुळे त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी काजूगर कारखानदांरानी केली आहे.