(राज्यासाठी विचार व्हावा) .....नव्या वर्षात कोल्हापूर आय लीगमध्ये पोहोचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:47+5:302020-12-28T04:13:47+5:30
सचिन भोसले - लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबाॅल पंढरीचा लौकिक सर्व देशभरात पोहोचला आहे. ‘विफा’चे अध्यक्ष व ...
सचिन भोसले - लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबाॅल पंढरीचा लौकिक सर्व देशभरात पोहोचला आहे. ‘विफा’चे अध्यक्ष व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कोल्हापुरी फुटबाॅलला मोठा चाहता वर्ग आहे. मग तेथे आयलीग संघ स्थापनेसाठी उद्योग व उद्योजक का पुढे येत नाहीत, असा सवाल केला होता. त्याची दखल घेत बंगलोर एफसीचे मालक व वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशन (विफा) चे उपाध्यक्ष पार्थ जिंदाल यांनी कोल्हापूरचा आयलीग संघ निर्माण करण्याची तयारी दर्शविली आहे. हा संघ उभारणीसाठी येणारा कोट्यवधीचा खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या संबंधीचे सूतोवाच त्यांनी दि. २२ रोजी झालेल्या ‘विफा’च्या ऑनलाईन बैठकीत केले. भारतीय फुटबाॅलमध्ये संतोष ट्राॅफीनंतर व्यावसायिक संघांमधील आय लीग व आयएसएल या दोन स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. या स्पर्धेतील संघांचे मालक देशातील टाॅपचे उद्योजक व त्यांना प्रायोजकत्व देणाऱ्या कंपन्यांही बड्या आहेत. त्याचा फायदा खेळाडूंना होत असून त्यांचे मानधन कोटीच्या घरात जात आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळणाऱ्या फुटबाॅलपटूला आपल्या खेळाचे कसब दाखवावे लागते. त्यातून प्रसिद्धीस आलेल्या फुटबाॅलपटूचा व त्या संघाचा भारतीय फुटबाॅलजगतात नावलौकिक होतो. त्यामुळे या स्पर्धांना व त्यात सहभागी असणाऱ्या कार्पोरेट संघांनाही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कोल्हापुरातील फुटबाॅलचा लौकिक व हजारो प्रेक्षकांची उपस्थितीची दखल कार्पोरेट विश्वातील जिंदाल कंपनीचे मालक असलेले पार्थ जिंदाल यांनीही घेतली आहे. त्यामुळेच कोल्हापूरचा आय लीगकरिता संघ निर्मिती करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. त्याकरिता लागणारा कोट्यवधीचा निधीही त्यांनी देऊ केला आहे. या प्रस्तावित संघाला सरावासाठी एक व सामने खेळण्यासाठी एक अशा दोन मैदानांची गरज आहे. ही गरज कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन भागवू शकते. त्यामुळे नव्या वर्षात कोल्हापूरच्या फुटबाॅलला सोनेरी दिवस येण्याची शक्यता आहे.
दोन संघांची निर्मिती
प्रस्तावित संघाची निर्मिती झाली तर आयएसएल स्पर्धेसाठी व आय लीग स्पर्धेसाठी असे दोन संघ निर्माण करावे लागतील. त्याकरिता कोल्हापुरातील स्थानिक फुटबाॅलपटूंनाही या व्यावसायिक संघात कौशल्य दाखवून संधी मिळू शकते. दोन्ही संघांत प्रत्येकी चार खेळाडू सहभागी होऊ शकतात.