महामानवांचे विचार देशाला महासत्ता बनवतील
By admin | Published: April 12, 2017 01:05 AM2017-04-12T01:05:29+5:302017-04-12T01:05:29+5:30
शरद गायकवाड : भीम महोत्सवास प्रारंभ, शहरातील हजारो कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह
कोल्हापूर : गौतम बुद्धाची शांती, भीमाची क्रांती आणि महात्मा जोतिबा फुले दाम्पत्याची ज्ञानक्रांती हीच भारताला महासत्ता बनवेल, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी मंगळवारी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्याख्यानात ते बोलत होते. महापौर हसिना फरास व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे बिंदू चौकात उद्घाटन झाले.
प्रा. डॉ. शरद गायकवाड म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांनी १८५४ ला पहिली रात्रशाळा त्यांनी काढली. त्यांचेच विचार थोर पुरुषांनी घेतले. सामाजिक परिवर्तनाचे ते युगप्रवर्तक होते. त्यांनी २ मार्च १८८८ ला प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. त्यांचे विचार मानवतावादी होते. हेच विचार पुढे सुरू आहेत आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही दिसून येतो. त्याचबरोबर त्यांचे कृषीक्षेत्रातही योगदान आहे. त्यांच्यामुळे ‘कृषी’चे बरेच प्रश्न
सुटले.
टी. एस. कांबळे यांनी स्वागत तर प्रा. विजय काळेबाग यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष सखाराम कामत, उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, प्रा. विश्वासराव देशमुख, बाळासाहेब भोसले, प्रकाश सातपुते, डी. जी. भास्कर,
अविनाश शिंदे, बबन शिंदे यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते.
दरम्यान, आज, बुधवारी डॉ. अच्युत माने यांचे सायंकाळी ५.३०
वाजता याचठिकाणी व्याख्यान होणार आहे.
महात्मा फुले जयंती सोहळा...
राजेंद्रनगर ,भारतनगर साळोखे पार्क येथील संयुक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्यावतीने मंगळवारी महात्मा फुले जयंती सोहळा सांस्कृतिक हॉलमध्ये झाला. महापौर हसिना फरास यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. यावेळी प्रा. उषा काळे यांचे महात्मा फुले यांच्यावर प्रबोधनपर व्याख्यान झाले.
यावेळी नगरसेवक रूपाराणी निकम, लाला भोसले, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
पाडळी बुद्रुकमध्ये महात्मा फुले जयंती...
पाडळी बुद्रुक (ता. करवीर) येथे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (बी. सी. कांबळे) महात्मा जोतिराव फुले यांची १९० जयंती साजरी करण्यात आली. पक्षाच्या शाखेचे अध्यक्ष नंदकुमार कांबळे होते. यावेळी बाजीराव कांबळे, अशोक पाटील, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.
आज ‘भीम फेस्टिव्हल’चे उद्घाटन...
माजी खासदार एस. के.डिगे मेमोरियल फाऊंडेशन यांच्यावतीने आज, बुधवारी शाहू स्मारक भवनात ‘भीम फेस्टिव्हल’चे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते दूपारी तीन वाजता होणार आहे. यावेळी संविधान कन्या मनश्री आंबेतकर हिची प्रकट मुलाखत होणार असल्याचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.लोकजनशक्ती पार्टीतर्फे विविध कार्यक्रम...
लोकजनशक्ती पार्टी कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी संदीप जिरगेनिर्मित व भीमक्रांती प्रस्तुत ‘गाथा भीमाची’ हा भीमगीतांचा कार्यक्रम बिंदू चौकात झाला.
आज, बुधवारी ‘आवाज भीमाचा’ तर गुरुवारी (दि. १३) भीम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (दि. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात येणार असल्याचे पत्रक सचिव तकदिर कांबळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.