कोल्हापुरात तिसऱ्यांदा ‘ग्रीन कॉरिडॉर’;तिघांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:14 AM2018-09-17T01:14:24+5:302018-09-17T01:14:27+5:30
कोल्हापूर : मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे त्याच्या नातेवाइकांच्या इच्छेनुसार यकृत व दोन किडन्या असे एकूण तीन अवयव दान करण्याची शस्त्रक्रिया कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये रविवारी दुपारी राबविली. धनंजय बापूसाहेब जामदार (वय ६१, रा. कसबेकर पार्क, महावीर महाविद्यालयानजीक) असे या मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे नाव असून, त्यांची एक किडनी आणि यकृत ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे पुण्यातील संबंधित रुग्णालयाकडे पाठविले. यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवून रस्ते वाहतुकीपासून रिकामे केले होते.
कसबेकर पार्क येथील धनंजय जामदार (वय ६१) यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांना शुक्रवारी (दि. १४) डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शनिवारी (दि. १५) सायंकाळी डॉक्टरांनी त्यांचा मेंदू मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर जामदार यांच्या पत्नी रोहिणी जामदार, मुलगा निखिल, मुलगी नेहा मराठे यांच्याशी डॉक्टरांनी चर्चा केली. त्यांनी अवयवदानाची तयारी दर्शविली. दरम्यान, सकाळी पुण्यातील संबंधित रुग्णालयातील रुग्णवाहिका हॉस्पिलमध्ये दाखल झाल्या. जामदार यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्यातील एका किडनीचे ‘डायमंड’मध्येच रुग्णाला प्रत्यारोपण केले. तर ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे दुसरी किडनी आणि यकृत पुण्याकडे पाठविले. हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जन डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर, अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. साईप्रसाद, किडनी स्पेशालिस्ट डॉ. विलास नाईक यांनी ही शस्त्रक्रिया राबविली.
अवयव परजिल्ह्णात
दुपारी साडेचार वाजता शस्त्रक्रियेनंतर एक किडनी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये, तर यकृत हे पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील रिसर्च सेंटरकडे ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे पाठविले. तेथे त्यांचे गरजू रुग्णावर प्रत्यारोपण केले. अवयव घेऊन रुग्णवाहिकेने जिल्हाधिकारी कार्यालय, धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी चौक, तावडे हॉटेलमार्गे राष्टÑीय महामार्गावरून पुण्याकडे प्रयाण केले.
तिसरी घटना
‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे अवयव परजिल्ह्णात पाठविण्याची कोल्हापुरातील ही तिसरी घटना होय. यापूर्वी दि. ५ मे रोजी अमर पांडुरंग पाटील (रा. निगवे), दि. १४ जुलै रोजी गुंजन बसराणी (रा. कोल्हापूर) या मेंदू मृत झालेल्या रुग्णाची अवयवदानाची शस्त्रक्रिया राबविली होती. त्यानंतर रविवारी डायमंड हॉस्पिटलमध्ये प्रथमच ही शस्त्रक्रिया केली.
वडिलांचेही देहदान
अवयवदान केलेले धनंजय जामदार हे युनायटेड इंडिया अॅश्युरन्स येथून सेवानिवृत्त झाले आहेत; तर त्यांचे वडील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी. डी. जामदार यांनीही १ जानेवारी २०१३ रोजी इच्छेनुसार मरणोत्तर देहदान केले होते; त्यामुळे त्यांनी वडिलांचा आदर्श कायम ठेवला.