तिसऱ्या दिवशी किरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत अंबाबाईचा किरणोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 10:53 AM2021-02-01T10:53:25+5:302021-02-01T10:55:21+5:30
Mahalaxmi Temple Kolhapur- करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायण किरणोत्सवात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. सायंकाळी पाच वाजून १८ मिनिटांनी महाद्वारपासून प्रवास सुरू केलेली किरणे पाच मिनिटे मूर्तीवर स्थिरावली. आज, सोमवारी किरणे चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायण किरणोत्सवात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. सायंकाळी पाच वाजून १८ मिनिटांनी महाद्वारपासून प्रवास सुरू केलेली किरणे पाच मिनिटे मूर्तीवर स्थिरावली. आज, सोमवारी किरणे चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मंदिरशास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या अंबाबाई मंदिरात सध्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळा सुुरू आहे. रविवारी या किरणोत्सवाचा तिसरा दिवस होता. सध्या थंडी सुुरू असल्याने सूर्यास्त लवकर होत आहे; शिवाय किरणे मूर्तीवर येईपर्यंत त्यांची तीव्रताही कमी होत आहे.
अशा वातावरणातही शनिवारी (दि. ३०) देवीच्या मूर्तीचा चरणस्पर्श केलेली किरणे रविवारी पुढचा प्रवास करीत मूर्तीच्या गळ्यापर्यंत आली. सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी महाद्वार कमानीतून आत आलेल्या किरणांनी गरुड मंडप, कासव चौक, पितळी उंबरा असे टप्पे पार करीत ६ वाजून १४ मिनिटांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. गुडघ्यापासून गळ्यापर्यंतचा चार मिनिटांचा प्रवास करीत ती ६ वाजून १८ मिनिटांनी लुप्त झाली.
रविवार असल्याने मंदिराच्या आवारात भाविकांची मोठी गर्दी होती. सर्व भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेता यावा, यासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आला होता. तसेच ध्वनिक्षेपकावरून या सोहळ्याची माहिती दिली जात होती.
किरणांचा प्रवास असा
- ५ वाजून १८ मिनिटे : महाद्वार रोड ५ वाजून ४६ मिनिटे : गरुड मंडप
- ६ वाजता : कासव चौक
- ६ वाजून ७ मिनिटे : पितळी उंबरा
- ६ वाजून १२ मिनिटे : दुसरी पायरी
- ६ वाजून १४ मिनिटे : चरणस्पर्श
- ६ वाजून १५ मिनिटे : गुडघ्यापर्यंत
- ६ वाजून १८ मिनिटे : गळ्यापर्यंत