रसिकांच्या प्रतिसादात राज्य नाट्य महोत्सवाची तिसरी घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 04:45 PM2019-07-18T16:45:23+5:302019-07-18T16:46:50+5:30
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ५८व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सवाची तिसरी घंटा बुधवारपासून वाजली. राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्व नाट्यप्रकारांत अव्वल ठरलेली नाटके पाहण्याची पर्वणी न दवडता कोल्हापूरकरांनी हाऊसफुल्ल गर्दी करीत या नाट्यकृतीला दाद दिली. पहिल्या दिवशी फोंडा येथील हंस संगीत नाट्यमंडळाने ‘अव्याहत’ हे नाटक सादर केले.
कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ५८व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सवाची तिसरी घंटा बुधवारपासून वाजली. राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्व नाट्यप्रकारांत अव्वल ठरलेली नाटके पाहण्याची पर्वणी न दवडता कोल्हापूरकरांनी हाऊसफुल्ल गर्दी करीत या नाट्यकृतीला दाद दिली. पहिल्या दिवशी फोंडा येथील हंस संगीत नाट्यमंडळाने ‘अव्याहत’ हे नाटक सादर केले.
केशवराव भोसले नाट्यगृहात सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या पुणे विभागाच्या उपसंचालक सुनीता अस्वले, महापौर सरिता मोरे, अनिरुद्ध अष्टपुत्रे व ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी अस्वले यांनी रसिकांपर्यंत उत्तमोत्तम नाटके पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
दरम्यान, डॉ. प्रवीण हेंद्रे, ज्येष्ठ रंगकर्मी वैशाली राजशेखर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, पत्रकार उदय कुलकर्णी, प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, छायाचित्रकार अनिल वेल्हाळ; तसेच नाटकाचे दिग्दर्शक रोहन नाईक व व्यवस्थापक मंदार जोग यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
दर्जेदार नाट्यकृतींची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात नाट्यकलेला उत्तेजन देण्यासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक, संगीत नाटक, हिंदी नाटक, बालनाट्य अशा विविध प्रकारांतील राज्य नाट्य स्पर्धेत अव्वल ठरलेल्या नाटकांचा महोत्सव पहिल्यांदाच कोल्हापुरात होत आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसानेही उसंत घेतली आहे. ही संधी साधून नाट्यरसिकांनी प्रयोगास उत्स्फूर्त हजेरी लावली. ‘अव्याहत’ हे नाटक बौद्ध साधूंच्या विश्वाचा वेध घेते. ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’चे प्रशांत जोशी, मिलिंद अष्टेकर यांनी संयोजन केले.