तिसरीही बैठक निष्फळ
By admin | Published: March 4, 2016 01:10 AM2016-03-04T01:10:01+5:302016-03-04T01:10:32+5:30
मजुरीवाढ प्रश्न : खर्चीवाले यंत्रमागधारकांची पुढील बैठक दोन आठवड्यांत घेण्याचे निर्देश
इचलकरंजी : खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीबाबत कापड व्यापारी संघटनेने दिलेला अंतिम प्रस्ताव अमान्य झाल्यामुळे येथील प्रांताधिकारी कार्यालयात चाललेली संयुक्त बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी १९ मार्चपर्यंत पुन्हा निर्णायक बैठक घेण्याचे निर्देश दिले.
शहर व परिसरातील जॉबवर्क करणाऱ्या खर्चीवाले यंत्रमागधारकांना सन २०१३ मध्ये झालेल्या करारानुसार साडेपाच पैसे प्रतिपीक मजुरी दिली जाते. कापड व्यापाऱ्यांकडून देण्यात येणारी ही मजुरी प्रत्येकी तीन वर्षांनी बदलली जाते. म्हणून जानेवारी २०१६ पासून प्रतिपीक नऊ पैसे याप्रमाणे मजुरीवाढ मिळावी, अशी मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत व्यापाऱ्यांच्या इचलकरंजी क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंटस् या संस्थेबरोबर यापूर्वी झालेल्या दोन बैठका निष्फळ झाल्या.
अशा पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी गुरुवारी पुन्हा मजुरीवाढीसंदर्भात इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व क्लॉथ अॅण्ड मर्चंटस् असोसिएशनच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. बैठकीसाठी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, कामगार अधिकारी द. दा. पवार, यंत्रमागधारकांच्यावतीने सतीश कोष्टी, नारायण दुरुगडे, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय कनोजे, महंमदरफिक खानापुरे, पांडुरंग पाटील, आदी उपस्थित होते. तसेच व्यापारी संघटनेच्यावतीने उगमचंद गांधी, घन:शाम इनानी, विनोद कांकाणी, राजाराम भुतडा, आदींनी चर्चेत भाग घेतला.
सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांशिवाय चर्चा पुढे सरकत नव्हती. वारंवार प्रांताधिकारी जिरंगे व सहायक कामगार आयुक्त गुरव यांना बैठकीतील चर्चा मुद्द्यावर येण्यासाठी हस्तक्षेप करावा लागत होता. ५२ पीक कापडासाठी किमान दोन रुपये ६० पैसे इतकी मजुरी दिली जाईल, कोणत्याही परिस्थितीत त्यापेक्षा खाली मजुरी व्यापाऱ्यांकडून दिली जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असा व्यापारी संघटनेने दिलेला प्रस्ताव यंत्रमागधारक संघटनेने नाकारला.