पुरोगामी कोल्हापुरात लाजिरवाणे कृत्य, धार्मिक कार्यक्रमात तृतीयपंथींचा सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर धिंगाणा
By तानाजी पोवार | Published: August 16, 2022 01:39 PM2022-08-16T13:39:43+5:302022-08-16T13:40:31+5:30
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना कोल्हापूरात धार्मिक कार्यक्रमात अशा पध्दतीने धिंगाणा सुरु होता.
कोल्हापूर : पुरोगामी कोल्हापुरात लाजिरवाणी घटना समोर आली आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली तृतीयपंथींचा सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना काल, सोमवारी देवीचे जग आणण्याच्या मिरवणुकीत तृतीयपंथीनी हे अत्यंत लाजीरवाणे कृत्य केले. हातात सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर हा धिंगाणा सुरु होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नागरीकांतून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. त्याबाबत आज, मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात कायद्याचा भंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
शुक्रवार पेठेतील एका तालीम मंडळाच्यावतीने तिसऱ्या सोमवारचे निमित्त साधून देवीचे जग आणण्याची दरवर्षी प्रथा आहे. सोमवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी देवीच्या जगाचे सवाद्य मिरवणूक काढणायात आली. मिरवणुकीत डॉल्बीच्या ठेक्यावर तृतीयपंथीनी समाजाला लाजवेल अशा पध्दतीने हावभाव करत नृत्य केले. भर गर्दीतही स्टेजवर तृतीयपंथी हातात सिगरेटचा धूर काढत धुम्रपान करत डॉल्बीच्या ठेक्यावर हा सारा नृत्याचा धिंगाणा सुरु होता.
पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण..
विशेष म्हणजे, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरात धार्मिक कार्यक्रमात अशा पध्दतीने धिंगाणा सुरु होता. लक्ष्मीपुरी पोलिसांनी हा सारा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. पण आज आमचा दिवस आहे, आम्हाला रोखायचे नाही अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावले, त्यामुळे पोलीसह हतबल झाल्याचे अनेकांनी सांगितले.
शिवसेनेची कारवाईची मागणी
पंचगंगा तालीम मंडळाच्यावतीने अशा धार्मिक सोहळ्यात छोटी वस्त्रे परिधान करुन अश्लिल हावभाव करत तृतीयपंथींना नाचवले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षि छ. शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमोर हा नंगानाच व व्यवसनाधीन कार्यकर्त्यांचे कृत्य हिंदू धर्माच्या भावाना दुखावणारे आहे, त्यामुळे संयोजकावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनिल मोदी, रविकिरण इंगवले, सन्वयक हर्षल सुर्वे आदी शिष्ठमंडळाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव यांना दिले.
कोल्हापुर- पुरोगामी कोल्हापुरात लाजिरवाणे कृत्य, धार्मिक कार्यक्रमात तृतीयपंथींचा सिगारेट ओढत डॉल्बीच्या ठेक्यावर धिंगाणा pic.twitter.com/qh418Zzfd3
— Lokmat (@lokmat) August 16, 2022