कोल्हापूरच्या दिग्दर्शकाच्या 'नजरिया'ला देशविदेशातील तब्बल १३ पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 04:44 PM2022-06-06T16:44:33+5:302022-06-06T16:52:19+5:30

अवयवदानाविषयी जनजागृती करणाऱ्या हिंदी लघुपटात वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सेजल कोरे हिची भूमिका कौतुकास पात्र ठरली आहे.

Thirteen awards for director Kiran Pote Hindi short film Nazariya | कोल्हापूरच्या दिग्दर्शकाच्या 'नजरिया'ला देशविदेशातील तब्बल १३ पुरस्कार

कोल्हापूरच्या दिग्दर्शकाच्या 'नजरिया'ला देशविदेशातील तब्बल १३ पुरस्कार

Next

कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील सरुड गावचे रहिवासी किरण पोटे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'नजरिया' या अवयवदानाविषयी जनजागृती करणाऱ्या हिंदी लघुपटाला देशविदेशातील विविध महोत्सवांत तेरा पुरस्कार मिळालेले आहेत. विशेष म्हणजे कोल्हापुरातील वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सेजल कोरे हिची यातील भूमिका कौतुकास पात्र ठरली आहे.

सरुड येथील भूमीहीन कुटुंबातील दिग्दर्शक किरण पोटे यांनी विविध छोट्यामोठ्या नोकऱ्या करत अभिरुची नाट्य संस्थेकडून राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका, पथनाट्यात अभिनय केला. २००९ पासून मुंबईत सिनेमा, मालिकेत छोट्या भूमिका करत लेखन, दिग्दर्शन ते पोस्ट प्रॉडक्शनपर्यंतच्या कामाचा अनुभव मिळवला.

सर्वप्रथम २०१९ मध्ये 'कल्टी' या त्यांच्या पहिला चित्रपटाला दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा ॲवार्ड मिळाला. याच वर्षी उद्यमनगरातील चिंध्या विकणाऱ्या महिलांच्या 'चिंध्या' या लघुपटाला चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार मिळाला. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांच्या 'नजरिया' या हिंदी लघुुपटाला विविध महोत्सवांत तेरा पुरस्कार मिळविले. या लघुपटात कैलास वाघमारे, प्रमोद शिंदे, मिलिंद ओक, बाजीराव गवळी, मारुती माळी, संतू पाटील, योजना खैरे, योगेश सोमण यांच्या भूमिका आहेत.

वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीने जिंकले मन

कोल्हापुरातील वृत्तपत्रविक्रेते सागर कोरे यांची कन्या सेजलने या लघुपटात प्रमुख भूमिका केली आहे. तिच्या पहिल्याच भूमिकेने चाहत्यांची मने जिंकली. सागर कोरे शिवाजी पेठ, मंगळवार पेठेत सकाळी वृत्तपत्र पोहचवून दिवसभर रिक्षा चालवतात. त्यांची कन्या सेजलने आता पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये पाचवीत प्रवेश घेतला आहे.

मिळालेले पुरस्कार : लॉस एंजलिसमध्ये बेस्ट इन्स्पिरिशनल शॉर्ट फिल्म, ब्लॅक स्वॅन इंटरनॅशनलमध्ये बेस्ट फिल्म ऑन डिसॲबिलिटी इश्यू, ग्रेट इंडियन शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट सोशल फिल्म, बेस्ट ड्रॅमॅटिक आर्ट फिल्म, स्पेशल ज्युरी पुरस्कार, रामेश्वरम इंटरनॅशनलमध्ये बेस्ट फिल्म ऑन डिसॲबिलिटी इश्यू, गोल्डन हॉर्स इंटरनॅशनलमध्ये बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म,

इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म आणि बेस्ट शॉर्ट फिल्म ऑन डिसॲबिलिटी इश्यू, आय इनसायनिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट ॲस्पायरियंग डिरेक्टर व बेस्ट कन्सेप्ट, शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले व इंडियन फिल्म मेकर्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट ॲस्पायरिंग डिरेक्टर असे तेरा पुरस्कार या लघुपटाला मिळालेले आहेत.

Web Title: Thirteen awards for director Kiran Pote Hindi short film Nazariya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.