शिरोली सांगली फाटा-अंकली चौपदरीकरणाचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:23 AM2021-01-18T04:23:03+5:302021-01-18T04:23:03+5:30
दत्ता बिडकर हातकणंगले : शिरोली-सांगली फाटा ते अंकली चौपदरी मार्गाचे ५९ टक्के काम पूर्ण झाले आहे. झालेल्या कामाचे ठेकदार ...
दत्ता बिडकर
हातकणंगले : शिरोली-सांगली फाटा ते अंकली चौपदरी मार्गाचे ५९ टक्के काम पूर्ण झाले आहे. झालेल्या कामाचे ठेकदार सुप्रीम कंपनीने ६८० कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. ४१ टक्के अपूर्ण कामाचा वाद उच्च न्यायालयामध्ये गेला आहे. नोव्हेंबर २०१७ पासून गेले तीन वर्षे या वादावर तोडगा निघत नसल्याने शासनाने या रस्त्याच्या किरकोळ दुरुस्तीसाठी २० कोटींचा निधी मंजूर केला. तरीही या रस्त्याची दुरवस्था कायम आहे.
मार्च २०१२ मध्ये शिरोली ते अंकली या ४० कि.मी. रस्त्याचे बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा या धोरणानुसार चौपदरी रस्त्याचे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले होते. १९६.६० कोटी अंदाजपत्रक असलेला हा रस्ता ऑक्टोबर २०१४ पर्यंत पूर्ण करून रस्त्यावर टोल आकारणी करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, महसूल विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून रस्त्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया, तसेच रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये आडवी येणारी घरे, शाळा काढण्याची प्रक्रिया रेंगाळल्यामुळे या चौपदरी रस्त्याचे काम रखडले ते आजअखेर रखडलेच आहे.
४१ टक्के अपूर्ण कामे
यामध्ये अतिग्रे गावातील दोन्ही बाजूचा रस्ता, हातकणंगले येथील उड्डाणपूल, सेवा मार्ग रस्ता, तमदलगे गावठाणमधील दोन्ही बाजूचा रस्ता, निमशिरगाव येथील जिल्हा परिषद शाळा, उदगाव गवती कुरण ओढ्यावरील पूल, जयसिंगपूर शहरातील रस्ता या कामाचा समावेश आहे .
चारवेळा मुदत वाढ
या चौपदरी रस्त्याच्या कामाला शासनाने चारवेळा मुदतवाढ दिली. ३१ मार्च २०१५, ३१ मे २०१५, ३१ ऑक्टोबर २०१५, ३० जून २०१६ अशी ती मुदतवाढ आहे. तरीही रस्त्याचे काम रखडले.
कंपनीला दररोज दीड लाखाचा दंड
२०१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी कंपनीला चार वेळा मुदतवाढ देऊनही काम वेळेत पूर्ण केले नसल्याने कारवाईची मागणी केली होती. यावर शासनाने काम पूर्ण होईपर्यंत दररोज दीड लाखाच्या दंडात्मक कारवाईचे आदेश दिले.
ठेकेदाराकडून रस्त्यासाठी ६८० कोटींची मागणी
या चौपदरी रस्त्याची अंदाजपत्रकीय किंमत १९६.६० कोटी आहे; पण ठेकेदार कंपनीने ६८० कोटींची मागणी केली आहे. हातकणंगले उड्डाणपुलासाठी पुन्हा ३२ कोटींचे अंदाजपत्रक आहे.
(भाग एक समाप्त )