कोल्हापुरात तेरा वर्षीय शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू, मित्रासोबत गेला होता पोहायला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:04 IST2025-03-08T12:03:24+5:302025-03-08T12:04:09+5:30
कोल्हापूर : कदमवाडी मुक्त सैनिक वसाहत परिसरातील काटे मळा येथील एका विहिरीत शाळकरी मुलगा बुडाला. पार्थ महेश परीट (वय ...

कोल्हापुरात तेरा वर्षीय शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू, मित्रासोबत गेला होता पोहायला
कोल्हापूर : कदमवाडी मुक्त सैनिक वसाहत परिसरातील काटे मळा येथील एका विहिरीत शाळकरी मुलगा बुडाला. पार्थ महेश परीट (वय १३, सध्या रा. मुक्त सैनिक वसाहत, मूळ रा. राधानगरी), असे त्याचे नाव आहे. काल, शुक्रवारी (दि.७) ही घटना घडली. अग्निशमन दलातर्फे त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता, आज, शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह हाती लागला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ याचे कुटुंब मूळचे राधानगरीमधील आहे. सध्या ते मुक्त सैनिक वसाहत परिसरात भाड्याने राहतात. त्याच्या वडिलांचा लॉण्ड्रीचा व्यवसाय आहे. पार्थ हा मुक्त सैनिक वसाहतीतील शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकतो. शुक्रवारी सायंकाळी आपल्या दोन मित्रांसोबत तो काटे मळा परिसरातील विहिरीत पोहण्यासाठी गेला. त्याने पाण्यात उडी मारली, तो बुडू लागल्याने त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा सुरू केली. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या एका मित्राने विहिरीत उडी मारली, मात्र त्याला यश आले नाही. घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी त्याच्या कुटुंबीयाला दिली. त्याचे आई-वडील आणि नातेवाईक धावतच त्या ठिकाणी आले. त्यांनी विहिरीवरच हंबरडा फोडला.
परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ दोन अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पाठविल्या. दलाच्या पाच जवानांनी विहिरीत शोध मोहीम राबविली. मात्र त्याचा शोध लागला नाही. रात्री आठ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. आज, शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह हाती लागला.
कष्टाळू कुटुंब.. मूळचे राधानगरीचे
पार्थचे आई-वडील कष्टाळू आहेत. आई घरकाम आणि वडील काही वर्षांपासून या ठिकाणी लॉण्ड्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी मुलाचे शिक्षण चांगले होण्यासाठी वालावलकर हायस्कूलमध्ये दाखल केले. मनमिळाऊ स्वभावाचा आणि खेळात प्रावीण्य असलेला म्हणून त्याची शाळेत ओळख आहे.