तेरा युवकांना अटक
By admin | Published: July 25, 2014 11:23 PM2014-07-25T23:23:52+5:302014-07-25T23:32:42+5:30
आंबोली हाणामारी प्रकरण : सर्व तरुण आजऱ्यातील
सावंतवाडी : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील महिलांची छेड काढून त्यांच्यासोबतच्या युवकांवर उकळलेले तेल फेकल्याप्रकरणी कोल्हापूर-आजरा येथील तेरा युवकांना सावंतवाडी पोलिसांनी आज, शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांमध्ये मायाप्पा इलगे, स्वप्निल निकम, सुनील निकम, दीपक निर्मळे, सतीश निर्मळे, राजेंद्र निकम, तुषार निर्मळे, अजित निर्मळे, अजित निकम, नीलेश निकम, अशोक पाचवरेकर, अनिल नार्वेकर, अजित भेवडे यांचा समावेश आहे.
याबाबतची माहिती अशी की, गेल्या रविवारी (दि. २०) कोल्हापूर येथील पर्यटक ट्रॅव्हलमधून हिरण्यकेशीकडे जात असतानाच तेथे एक सुमो गाडी आली. या गाडीतील युवकांनी ट्रॅव्हल्समधील महिला व युवतींची छेड काढली. यामुळे ट्रॅव्हल्समधील युवकांनी सुमो गाडीतील युवकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला; पण त्या टॅ्रव्हल्समधील युवकांना सुमो गाडीतील युवकांनी बेदम मारहाण केली.
मारहाण सुरू असतानाच ट्रॅव्हल्समधील बाबू मिशाळ हा नजीकच्या तावडे हॉटेलमध्ये पळाला. यावेळी सुुमोतील युवकांनी त्याचा पाठलाग करीत हॉटेलमधील कढईतील उकळलेले तेल त्याच्या अंगावर ओतले. यात बाबू मिशाळ हा गंभीर जखमी झाला आहे. या झटापटीमध्ये टॅ्रव्हल्समधील महिलांचे दागिनेही लंपास करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून शोधाशोध सुरू केली. यावेळी ती सुमो गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा-पारेवाडी येथील असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी आजरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
आजरा पोलिसांनी त्या युवकांना आज आंबोली पोलीस ठाण्यात आणले. तेथून सावंतवाडी पोलिसांनी त्या तेराजणांना ताब्यात घेत सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या तेराही युवकांना जामीन मंजूर केला. (प्रतिनिधी)