मुरगूडमध्ये तीस बेडचे कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:25 AM2021-05-20T04:25:54+5:302021-05-20T04:25:54+5:30
या उपचार केंद्राचे आज तहसीलदार शिल्पा ठोकडे व जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण ...
या उपचार केंद्राचे आज तहसीलदार शिल्पा ठोकडे व जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
मुरगूड व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, याची लोकप्रतिनिधींनी व शासनस्तरावर दखल घेण्यात आली .विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी यासाठी आग्रही भूमिका घेतल्यामूळे आज तातडीने मुरगूड ग्रामीण रुग्णालयात खासदार संजय मंडलिक यांच्या फंडातून निर्माण केलेल्या अतिदक्षता विभागात कोविड समर्पित उपचार केंद्र सुरू करण्यात आले.
या कोविड समर्पित उपचार केंद्रात ३० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे . त्यामध्ये ६ बेड ऑक्सिजन बेड आहेत. १५ जम्बो सिलिंडर ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील व मुरगूड शहरातील कोरोना रुग्णांनी या सर्व सोयींनीयुक्त असणाऱ्या उपचार केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष राजेखान जमादार व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. एन्. डवरी यांनी केले. याच ठिकाणी पूर्ण क्षमतेने ऑक्सिजनचे ३० सुसज्ज बेडचा विभाग लवकरच सुरू होणार आहे व त्यासाठी स्वतंत्रपणे डॉक्टर व आरोग्यसेवक कार्यरत राहाणार आहेत.
यावेळी गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. एन्. डवरी, डॉ. अमोल पाटील, नगरसेवक विशाल सूर्यवंशी, अमर सनगर, अभियंता प्रकाश पोतदार, जयवंत गोधडे, अमर कांबळे, विजय मोरबाळे, सर्जेराव कदम, आरोग्यसेवक व पालिका कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ :-
मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील समर्पित कोविड उपचार केंद्राचे लोकार्पण करताना तहसीलदार शिल्पा ठोकडे, नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, गटविकास अधिकारी सुशील संसारे.