३५ मीटर रीडरचा तीन कोटींचा भार
By admin | Published: June 11, 2015 11:58 PM2015-06-11T23:58:08+5:302015-06-12T00:35:33+5:30
मुदत संपली तरी कामावर : महापालिका आयुक्तांकडे तक्रार
कोल्हापूर : महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयात गेल्या सहा महिन्यांपूर्वी ठोक मानधनवर ३५ मीटर रीडरची भरती केली. त्यांची सहा महिन्यांची मुदत संपली तरी त्यांना कामावर ठेवण्याचे ‘मोठेपण’ अधिकाऱ्यांनी दाखविले. प्रत्यक्षात मीटर रीडरच्या नावाखाली भरती केलेले यांतील बहुतांश कर्मचारी कार्यालयातच ठाण मांडून असतात. पाणीपुरवठा विभागातील दोन अधिकाऱ्यांच्या हट्टामुळेच या मीटर रीडरच्या ठोक मानधनापोटी महापालिकेवर महिन्याला २ कोटी ९७ हजारांचा बोजा पडत असल्याचा आरोप होत आहे.
कर्मचारी भरतीस प्रतिबंध आहे. पाणीपुरवठा विभागात १५ फिटर, १८ पंप आॅपरेटर व ३५ मीटर रीडरची ठोक मानधनावर भरती केली. सहा महिन्यांसाठी केलेली ही भरतीची मुदत ११ मे २०१५ रोजी संपली.
ठोक मानधनावर भरती प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असताना या कर्मचाऱ्यांना पुन्हा मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाचे शरद मिराशी यांनी आयुक्तांकडे केली आहे.
ठोक मानधनवर भरती केलेल्या मीटर रीडरना गरजेनुसार मुदतवाढ देण्याचा तसेच पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. त्यानुसार या रीडरना ‘स्थायी’च्या मंजुरीने नुकतीच मुदतवाढ दिली. भरती प्रक्रिया बंद असल्याने कार्यालयीन सोयीसाठी संगणकीय ज्ञान असलेले काही मुद्दामहून भरती करून त्यांना त्या पद्धतीने काम दिले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.