थर्टीफस्टला ७५८ वाहनधारकांवर पोलिसी कारवाई, १२ जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:27 PM2021-01-02T12:27:19+5:302021-01-02T12:29:16+5:30
31st December party Kolhapur- थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचा भंग करुन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. यावेळी ७५८ वाहनचालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ४३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला तर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
कोल्हापूर : थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचा भंग करुन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. यावेळी ७५८ वाहनचालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ४३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला तर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाला घरात बसूनच निरोप देण्याचे आवाहन केले होते. यावेळी कायद्याचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यभरात सर्वत्र गुरुवारी दिवसभर व शुक्रवारी पहाटेपर्यंत कारवाई करण्यात आली.
कोल्हापुरात झालेल्या कारवाईत प्रवेश बंद मार्गातून प्रवेश करणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे, एका दुचाकीवरुन दोनपेक्षा अधिकजणांनी प्रवास करणे, वाहनांचे क्रमांक विहीत नमुन्यात नसणे, नो पार्किंग, वाहन चालवताना सीटबेल्ट न लावणे, रहदारीला अडथळा निर्माण करणे अशाप्रकारे वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी ७५८ जणांकडून ४३ हजार ५०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. यासाठी वाहतूक शाखा व सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावले.
दंड असा आकारला
- प्रवेश बंद मार्गातून प्रवेश करणे - ४७
- वाहन चालवताना मोबाईलचा वापर - १८
- दोनपेक्षा अधिकजण वाहून नेणे (ट्रीपल सीट) - ३८
- फॅन्सी नंबरप्लेट - १०४
- कर्णकर्कश हॉर्न वाजविणे : १९
- नो पार्किंग - १४
- झेब्रा क्रॉसिंग - २३
- सिंग्नल जंप करणे - ०१
- रहदारीला अडथळा निर्माण होईल असे वाहन उभे करणे - १२२
- वाहन चालवताना सीटबेल्ट न लावणे - ०९
- हेल्मेटसह भरधाव वेगाने वाहन चालविणे अशी इतर कारवाई - ७५८
थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत केलेल्या तपासणीत १२ जण मद्यप्राशन करून वाहने चालवताना आढळले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ब्रेथ अनालायझरचा वापर पोलिसांनी केला नाही. मात्र, संशयित वाटणाऱ्या वाहनचालकांची सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यामध्ये १२ जणांनी मद्यप्राशन केल्याचे आढळले. त्यांच्यावर कलम १८५नुसार कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले.