रुग्णालयात अडकलेले ३५ रुग्ण ट्रकमधून काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:52+5:302021-07-24T04:15:52+5:30
कोल्हापूर : कोंडा ओळ नजीकच्या छत्रपती संभाजी पुलावरील एका रुग्णालयात पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे ३५ रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना ...
कोल्हापूर : कोंडा ओळ नजीकच्या छत्रपती संभाजी पुलावरील एका रुग्णालयात पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे ३५ रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना नागरिकांनी ट्रकमधून बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला.
महापुराचे पाणी जयंती नालामार्गे बाहेर रस्त्यावर आले, ते पाणी शाहूपुरीतही घुसल्याने अनेक कुटुंबांची तारंबळ उडाली आहे. कोंडा ओळ चौक दरम्यान हे पुराचे पाणी रस्त्यावर आले. पुराचे पाणी झपाट्याने वाढत गेल्याने संभाजी पुलानजीक असलेल्या एका खासगी रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना बाहेर काढण्यासाठी परिसरातील नागरिक पुढे सरसावले. रुग्णवाहिका पुराच्या पाण्यात घालून पहिल्या दहा रुग्णांना त्याद्वारे पुराच्या पाण्यातून बाहेर काढले, रुग्णालयनजीक कमरेपर्यत पाणी वाढल्याने रुग्णवाहिका पाण्यात अडकली. पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागल्याने मदतकार्यातील नागरिकांनी ट्रकचा आधार घेतला. एका ट्रकमध्ये उर्वरित सर्व रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना घेऊन पुराच्या पाण्यातून सुस्थितीत बाहेर काढले. हा ट्रक कोंडा ओळ चौकानजीक आणल्यानंतर त्यातील रुग्णांना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने इतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या मदतकार्यात अग्नीशमन दलाचे गणेश लकडे, सुरेश जगदाळे, रोहन लकडे यांच्यासह स्वप्नील जाधव, रविराज पाटील, सुदेश संकपाळ, अमित चौगुले, इरफान मोमीन आदींनी मदतकार्य राबवले.
फोटो : २४०७२०२१-कोल-हॉस्पिटल०१,०२,०३
ओळ : येथील लक्ष्मीपुरी कोंडा ओळ परिसरात महापुरामध्ये अडकलेल्या रुग्णालयातील सुमारे ३५ हून अधिक रुग़्णांना नागरिकांनी ट्रकमधून बाहेर काढून इतर रुग्णालयात दाखल केले.