चिमुरड्या एधिताने अनुभवला ‘व्हॅली क्रॉसिंग’चा थरार
By admin | Published: February 14, 2016 12:57 AM2016-02-14T00:57:27+5:302016-02-14T00:57:27+5:30
विशाळगडावर उपक्रम : १५०० फूट खोल दरी; ६५० फुटांचे अंतर
कोल्हापूर : विशाळगड येथे दीड हजार फूट खोल दरी आणि साडेसहाशे फूट लांबीचे अंतर असा साहसपूर्ण खेळाचा थरार आबालवृद्धांसह कोल्हापुरातील पाच वर्षांच्या एधिता विवेक आजरी हिनेही पूर्ण केला. अशा प्रकारे जीवघेण्या थरारामध्ये सहभागी होणारी ती पहिलीच लहान मुलगी आहे.
पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच वेस्टर्न माउंटन स्पोर्टस व हिल रायडर्स गु्रपच्या वतीने स्वर्गीय गिर्यारोहक कार्तिक कांबोज यांच्या स्मरणार्थ विशाळगड येथे ‘व्हॅली क्रॉसिंग’चा थरार आयोजित केला होता. या झिप लाईन (व्हॅली क्रॉसिंग)मध्ये मोठ्यांनीही खाली पाहिले तर कोणाचेही डोळे गरगरायला लावील अशी दीड हजार फूट खोल दरी आणि कड्यावरून पाहिले असता जमिनीवरील माणूस मुंगीएवढा दिसतो, असे साडेसहाशे फूट लांबीचे अंतर, तेही दरीवरून अगदी ५५ ते ६० सेकंदांत पार करायचे, असा साहसपूर्ण खेळाचा थरार अनेकांनी अनुभवला.
या साहसी उपक्रमात मोठ्या व्यक्तींबरोबर कोल्हापुरातील विवेक आजरी यांची पाचवर्षीय कन्या एधिता हिनेही ही दरी मोठ्या धैर्याने पार करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अशा प्रकारे जीवघेण्या थरारामध्ये सहभागी होणारी ती पहिलीच लहान मुलगी आहे. ती बड्स प्ले अॅँड प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ज्युनिअर के.जी.मध्ये शिकत आहे. एधिताने यापूर्वीही अशा प्रकारचे साहस करीत दांडेली (जि. बेळगाव) येथे ‘रिव्हर क्रॉसिंग’चा अनुभव घेतला आहे.
ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज, परेश चव्हाण, दीपा बुकशेठ यांचे मार्गदर्शन एधिता आजरी हिला लाभले. (प्रतिनिधी)