तीस वर्षांनंतर ‘गोकुळ’वर तालुक्यातून दोन संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:24 AM2021-05-06T04:24:02+5:302021-05-06T04:24:02+5:30

गेल्या तीस वर्षांचा गोकुळ संचालकपदाचा तालुक्याचा वनवास संपला असून, दोन्ही पॅनेलमधून तालुक्यात दोन संचालक प्रथमच गोकुळमध्ये पोहोचले आहेत. तालुक्याच्या ...

Thirty years later, two directors from Gokul taluka | तीस वर्षांनंतर ‘गोकुळ’वर तालुक्यातून दोन संचालक

तीस वर्षांनंतर ‘गोकुळ’वर तालुक्यातून दोन संचालक

Next

गेल्या तीस वर्षांचा गोकुळ संचालकपदाचा तालुक्याचा वनवास संपला असून, दोन्ही पॅनेलमधून तालुक्यात दोन संचालक प्रथमच गोकुळमध्ये पोहोचले आहेत. तालुक्याच्या विकासाला यामुळे चालना मिळणार असली तरी वर्षभरात होणाऱ्या सहकारी संस्था, राजाराम कारखाना, वडगाव मार्केट कमेटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकामध्ये नवी राजकीय समीकरणे जुळणार की पारंपरिक विरोधक आमने-सामने येणार हे काळच ठरविणार आहे.

हातकणंगले तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे रणांगण राजकीय उलथापालथीने गाजले. तीन मंत्री, एक खासदार, चार आमदार, माजी आमदार असलेल्या महाविकास आघाडीच्या शाहू शेतकरी आघाडीकडून मागासवर्ग गटातून माजी आ. सुजित मिणचेकर यांना लॉटरी लागली. काँग्रेस (आय) पक्षाचे आ. राजूबाबा आवळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिणचेकरांंचा हिरिरीने प्रचार केला. विधानसभेला एकमेकांचे विरोधक असताना गोकुळमध्ये एकत्र येऊन महाविकास आघाडी धर्म पाळला.

सत्ताधारी आ. पी. एन. पाटील, माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या आघाडीतर्फे प्रथमच महाडिक घरातील उमेदवारी होती. महाडिक मुक्त गोकुळ अशी विरोधी गटाची प्रचार यंत्रणा होती. मात्र, मतदारांनी शौमिका महाडिक यांना गोकुळवर पाठवून महाडिक गटाची तालुक्याच्या राजकारणावर पकड असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.

गोकुळवर तालुक्यातून प्रथमच सत्ताधारी आणि विरोधी असे दोन संचालक निवडून गेल्याने तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. दुग्ध उत्पादनात तालुका आघाडीवर असूनही वारणा, स्वाभिमानी संघाकडे होणाऱ्या दूध पुरवठ्यामुळे गोकुळकडे तुलनेने कमी दूध संस्था आहेत. दोन संचालकांच्या पाठबळावर गोकुळचा दूध पुरवठा वाढेल याची खात्री वाढली आहे.

गोकुळच्या रणागणांमुळे तालुक्याचे राजकारण नव्या वळणावर पोहोचले आहे.

पारंपरिक विरोधक एकत्र आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्ष एकत्र आले आहेत, तर महाडिक गटाबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपचा घरोबा निर्माण झाल्यामुळे वर्षभरामध्ये होणाऱ्या विविध सहकारी संस्था, राजाराम कारखाना, वडगाव मार्केट कमिटी, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये नवी राजकीय समीकरणे जुळणार की पारंपरिक विरोधकांमध्ये सामना होणार हे काळच ठरविणार आहे.

Web Title: Thirty years later, two directors from Gokul taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.