कोल्हापुरात यंदा ४१ फूट पाणीपातळीलाच पन्हाळा रस्ता पाण्यात, आपत्ती व्यवस्थापनाकडूनही अभ्यास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 01:55 PM2024-07-26T13:55:38+5:302024-07-26T13:58:49+5:30
कारणे काय..?.. जाणून घ्या
कोल्हापूर : याआधी २०१९ आणि २०२१ मधील पुराच्या वेळी जेव्हा पंचगंगा नदीची राजाराम पातळीवरील पातळी ४३ फूट अशी धोक्याची होती त्याचवेळी पन्हाळा रस्त्यावर पाणी आले होते. परंतु, यंदा यात मोठा फरक पडला असून, ही पातळी ४१ फुटांवर असतानाच पन्हाळा रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागही याचा अभ्यास करीत आहे.
सन २००० नंतर आलेल्या तीनही पुरांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर पशुधनाची हानी झाली होती. पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याची पातळी जेव्हा ३९ फुटांवर असते तेव्हा ती ‘इशारा पातळी’ मानली जाते. त्यामुळे या पातळीवर पाणी गेले की प्रशासन अलर्ट मोडवर येते. नागरिकांनाही या पाणीपातळीची माहिती असल्याने सुतार मळा, शाहूपुरीतील कुंभार गल्ली, बापट कॅम्प, कसबा बावड्याकडील नदीकाठचा परिसर या सगळ्यांनी कधी घराबाहेर पडायचे हे ठरवलेले असते. चिखली, आंबेवाडीचे ग्रामस्थही पूर्वानुभवावरून याबाबत निर्णय घेतात.
परंतु, यावेळी ४३ फुटांवर पाणी येण्याआधीच ते राजाराम बंधाऱ्यावर ४१ फुटांवर असतानाच कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर पाणी आले आहे. हाच हिशोब लावला तर जो राष्ट्रीय महामार्ग याआधीच्या महापुरावेळी ५० फुटांची पातळी असताना बुडाला होता तो ४८ फुटांच्या पातळीवरच बुडू शकतो. ही शक्यता गृहीत धरून आपत्ती व्यवस्थापन विभागदेखील वेगळ्या पद्धतीने याचा हिशोब लावू पाहत आहे.
कारणे काय..?
महापूर आला, नुकसान झाले की कोल्हापूरला ब्लू लाइन, रेडझोनची आठवण येते. त्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी होते. त्यावर चर्चाही झडतात. परंतु, पूर ओसरला, पाणी कमी झाले की मागील पानांवरून पुढे असा अनुभव नेहमीच येतो. त्यामुळे नदीपात्रालगतच टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. जिथे नवीन पुलांचे बांधकाम होत आहे, तिथे मुरुमांचे ढीग ओतून रस्ते उंच केले जात आहेत. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यास अडचणी येत असल्याने पुराचे पाणी तुंबून राहत आहे. परंतु, त्यापासून आपण आजपर्यंत काही धडा घेतलेला नाही, यापुढेही काही घेऊ असे वाटत नाही.
रात्रीच्या वेळी सजग राहण्याची गरज
जिल्ह्याच्या विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसरात्र पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर १४ तासांनी हे पाणी कोल्हापुरात पोहोचते. त्यामुळे या सोडलेल्या पाण्याचा नेमका परिणाम हा शुक्रवारी पहाटे जाणवणार आहे. परंतु, कोल्हापूर शहरासह सर्वत्र पाऊस असल्याने याआधी मध्यरात्री नागरिकांना हलवताना प्रचंड तणाव प्रशासनावरही आला होता आणि नागरिकही त्यावेळी अडचणीत आले होते. हा अनुभव लक्षात घेऊन नागरिक आणि प्रशासनाने रात्रीच्या वेळी सजग राहण्याची गरज आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही याच मुद्द्यावर भर दिला आहे.