लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वास राष्ट्रपतींना निमंत्रण देणार, कोल्हापूर ते केंब्रिजपर्यंत कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 01:10 PM2022-03-21T13:10:21+5:302022-03-21T13:10:21+5:30
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीचे यंदाचे वर्ष लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व म्हणून साजरे होणार आहे. यानिमित्त जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहू विचारांची महती सांगणारे कार्यक्रम सादर होणार
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीचे यंदाचे वर्ष लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व म्हणून साजरे होणार आहे. यानिमित्त जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहू विचारांची महती सांगणारे कार्यक्रम सादर होणार आहेत. त्याची सुरुवात भवानी मंडपात १८ एप्रिलला होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांच्या रथोत्सवाच्या दिवसापासून होत आहे, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
खासदार संभाजीराजे यांनी शताब्दीच्या मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना कोल्हापुरात आणण्याचा शब्द दिला. त्यासाठी राज्य सरकारचे पत्र देण्याची जबाबदारी पालकमंत्री पाटील व मुश्रीफ यांनी घेतली.
राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहात यासंदर्भात प्राथमिक नियोजनाची बैठक झाली. प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत आसगावकर, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. रमेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कृतज्ञता पर्वाच्या लोगोचे अनावरण केले.
यावेळी पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी आणखी काही सूचना आल्या तर स्वागतच आहे, हा लोकोत्सव स्वरूपाचा भव्य दिव्य आणि महत्त्वाचा म्हणजे शाहू महाराजांच्या कार्याची महती राज्याला, देशाला आणि जगाला दाखवणारा कार्यक्रम असावा, असे नियोजन करत असल्याचे सांगितले.
सर्वसाधारण रूपरेषा
- १८ एप्रिलला लोकराजा पर्वाची सुरुवात
- ५ मे रोजी एकाच वेळी शंभर ठिकाणी शाहू विचारांवर व्याख्याने
- ६ मे रोजी एकाच वेळी शंभर सेकंदांची आदरांजली.
- ६ मे - शहरातून जन्मस्थळ ते समाधिस्थळ कृतज्ञता फेरी
- १ ते ५ मे - कोल्हापूर ते मुंबई समता रॅली
कोल्हापूर ते केंब्रिजपर्यंत कार्यक्रम
शाहू महाराजांचे कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवरील असल्याने जेथे जेथे त्यांच्या स्मृती आहेत, तेथे तेथे कार्यक्रम घेऊन शाहू महाराज नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे ठरले. यात नाशिकमधील पिंपळेश्वरा येथील गणपतराव मोरे यांच्या घरी, नागपूरला बहिष्कृत समाज बैठक, कानपूरला राजर्षी पदवी मिळालेले ठिकाण, धारवाड, बडोदा यांच्यासह केंब्रिज विद्यापीठात एलएल.बी. घेतलेले ठिकाण अशा सर्व ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी पुढाकार घेऊ, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
शाहू मिल आराखडा तयार
शाहू जन्मस्थळ ६ मेच्या पूर्णत्वास जाणार आहे. दोन दिवसांत त्याचा पाहणी दौरादेखील होणार आहे. शाहू मिल हेच भविष्यातील मोठे स्मृतिस्थळ असल्याने तेथेच या शताब्दीचे जास्तीत जास्त कार्यक्रम घ्यावेत असे आमचे नियोजन असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. शाहू मिलच्या स्मृतिस्थळावर पुढील आठवड्यात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासोबत आढावा बैठक आहे. या आराखड्याचे आचारसंहिता संपल्यावर केशवराव भोसले नाट्यगृहात सादरीकरण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.