मेघाची कावड उदंड हाय; कोल्हापुरातील गडमुडशिंगी येथील त्रैवार्षिक यात्रेत भाकणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 04:09 PM2024-03-02T16:09:56+5:302024-03-02T16:09:56+5:30
देशाच्या राजकारणात भगवा फडकेल
गांधीनगर : ‘मेघाची कावड उदंड हाय, पांढरीचे रक्षण करीन, बाळगोपाळांना सुरक्षित ठेवीन व रोगराई हटवीन, तसेच भगवा जगावर राज्य करील,’ अशी भाकणूक देवऋषी यांनी केली. या वर्षी पर्जन्यमान समाधानकारक होईल, देशाच्या राजकारणात भगवा फडकंल, पीक पाणीही उदंड होण्याचे भाकीत गडमुडशिंगी येथील श्री धुळसिद्ध बिरदेव त्रैवार्षिक जळयात्रेतील भाकणुकीत वाशी येथील देवऋषी भगवान पुजारी व गडमुडशिंगी येथील गणपती पुजारी यांनी वर्तवले.
या वर्षी धुळसिद्ध बिरदेव त्रैवार्षिक जळयात्रेस महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा या राज्यांतून हजारो भाविकांनी उपस्थिती दाखवत मोठ्या उत्साहात सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडले. यामध्ये रविवारी (दि़ २५) करसिद्ध माळीतून पालखीचे धुळसिद्ध बिरदेव मंदिरात आगमन, रात्री खणाची मेंढी व सोमवारी ( दि़. २६) गुरुशिष्य भेट व २१ गावांतील सुवासिनींचे पूजन करण्यात आले. मंगळवारी (दि २७) रोजी अभूतपूर्व उत्साहात जळ काढण्यात आला. नवीन तयार केलेल्या रथातून कर हातात घेतलेल्या सिद्धांसह मोठ्या संख्येने ढोल-कैताळांच्या निनादात जळविधी पार पडला. बुधवार, दि. २८ रोजी खाटीक बोनी, तर २९ तारखेला गाव बोनीने भाविकांकडून खारा-नैवेद्य गोडा नैवेद्य देवाला अर्पण करण्यात आला. शुक्रवारी (दि. १) आंबील बोनीने यात्रेची सांगता झाली.
ग्रामपंचायत प्रशासनाकडून नेटके नियोजन केले. पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतेची व यात्रेतील सर्व दुकानांची व्यवस्था उत्तम राखली होती व संपूर्ण गावात सर्व मंदिरांवर व शिवाजी चौकामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली होती़. या संपूर्ण याचा काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गांधीनगर पोलिसांकडून विशेष परिश्रम घेण्यात आले. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरपंच अश्विनी अरविंद शिरगावे व छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक व उपसरपंच तानाजी कृष्णात पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी नेटके नियोजन केले होते.