काेल्हापूरच्या शाही दसऱ्याला शासनाकडूनच ठेंगा, राज्य महोत्सवासाठी यंदा निधीच नाही
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 1, 2024 06:10 PM2024-10-01T18:10:47+5:302024-10-01T18:11:12+5:30
योजनांचा फटका
इंदुमती गणेश
कोल्हापूर : विधानसभेच्या तोंडावर ढीगभर योजनांमधून नागरिकांवर हजारो कोटी रुपये खर्च करत असलेल्या शासनाकडून काेल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला मात्र ठेंगा दाखविण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य महोत्सव म्हणून जाहीर झालेल्या या सोहळ्यासाठी यंदा निधीची तरतूद झालेली नसल्याने कार्यक्रम कसे करायचे, असा पेच जिल्हा प्रशासनापुढे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर छोट्या स्वरूपात कार्यक्रमांची आखणी केली जात आहे.
म्हैसूरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा प्रसिद्ध आहे. देशातील ५१ शक्तिपीठे, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख देवता म्हणून करवीर निवासिनी श्री अंबाबाईची जगभर ख्याती आहे. दुसरीकडे जणू दुर्गेचेच रूप असलेल्या छत्रपती ताराराणींनी स्थापन केलेल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्याईने नटलेल्या कोल्हापूर संस्थान गादीचे ऐतिहासिक महत्त्वही तितकेच अबाधित आहे. या धर्मसत्ता आणि राजसत्तेचा अनोखा मिलाफ कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवातून व शाही दसरा सोहळ्यातून प्रतिबिंबित होतो. दसऱ्याला महाराष्ट्रात एवढ्या भव्यदिव्यपणे साजरा होणारा सीमोल्लंघन हा एकमेव सोहळा आहे.
या सोहळ्याची ख्याती जगभर पोहोचावी, या सोहळ्याचे ब्रॅंडिंग व्हावे यासाठी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विशेष प्रयत्न केले होते. परिणामी राज्य शासनाने काेल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला व त्यासाठी २ कोटींच्या निधीची तरतूद केली होती.
गेल्या वर्षी शाही दसरा महोत्सवांतर्गत नऊ दिवस मोठ्या प्रमाणात भव्यदिव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. पण यंदा या साेहळ्यासाठीच्या निधीला शासनाकडून ठेंगा दाखविण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच छोट्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
दसरा चौकातील कार्यक्रमांवर फुली
गेल्या वर्षी दसरा चौकात नवरात्रोत्सवात रोज राज्यभरातील दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. त्याची व्यापक प्रसिद्धी न झाल्याने सुरुवातीच्या काही कार्यक्रमांना रसिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. पण अखेरच्या टप्प्यात चांगलीच गर्दी असायची. पण यंदा दसरा चौकात सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत.
हे असतील कार्यक्रम
ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता, महिलांची बाइक रॅली, दुर्मीळ कागदपत्रांचे प्रदर्शन, पारंपरिक वेशभूषा दिवस, शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, बचत गटांचे स्टॉल, युद्धकला प्रात्यक्षिक. दसऱ्या दिवशी न्यू पॅलेस ते दसरा चौक तसेच भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर शाही रॅली.