स्वाभिमानीची ऊस परिषद शेवटच्या आठवड्यात शक्य, ऊस उत्पादकांना उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 05:35 PM2024-10-04T17:35:05+5:302024-10-04T17:35:58+5:30
शनिवारच्या मेळाव्यात तारीख निश्चित होणार
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची २३ वी ऊस परिषद या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. येत्या शनिवारी उदगाव येथे दुपारी १२ वाजता कल्पवृक्ष गार्डनमध्ये होणाऱ्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात परिषदेची तारीख निश्चित होणार आहे. दरम्यान, या ऊस परिषदेतील ऊस दराकडे उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या २२ वर्षांपासून जयसिंगपूर येथे ऊस परिषद होते. यामध्ये जाहीर केलेला दर मिळण्यासाठी संघटना टोकाचा संघर्ष करीत असते. या परिषदेला सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यातील शेतकरी हजेरी लावून दरासाठीच्या पुढील लढ्याला सज्ज होतात.
यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्येच परिषद होणार आहे. परिणामी सर्वत्र निवडणुकीचे वातावरण असताना परिषदेला किती शेतकरी उपस्थित राहणार आणि त्यामध्ये काय निर्णय होणार यासंबंधी उत्सुकता लागून राहिली आहे. यंदाच्या हंगामात एकरकमी एफआरपी किती द्यावी आणि गेल्या हंगामातील कारखानदारांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रतिटन दुसरा हप्ता ५० आणि १०० रुपये मिळण्यासाठीच्या लढ्याचा निर्णय परिषदेत होणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून बैठकीचे निमंत्रण नाही..
केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोलच्या ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा कायम करावा, सन २०२२-२३ हंगामातील देय ५० आणि १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्यास शासनाने मान्यता द्यावी, यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन संघटनेस दिले होते. दरम्यान, शासनाने ५०, १०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याला शासनाने मान्यता दिली. त्यामुळे हा विषय संपला. पण एकरकमी एफआरपीप्रश्नी नियोजित बैठक गुरुवारी होणे अपेक्षित होते. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून संघटनेला बैठकीचे निमंत्रण आले नाही. परिणामी बैठक झाली नाही.
ऊस परिषदेच्या तारखेचा निर्णय येत्या शनिवारच्या मेळाव्यात होईल. ही २३ वी ऊस परिषद आहे. यापूर्वीच्या चार ऊस परिषदा आचारसंहितेमध्येच झाल्या आहेत. त्यामुळे ऊस परिषदेला आचारसंहितेचा काहीही अडथळा येणार नाही. यंदाची ऊस परिषदही मोठ्या ताकदीनेच घेतली जाईल. -राजू शेट्टी, माजी खासदार, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना