मुंबईच्या सुशिला साबळे यांना यंदाचे कुसुम पारितोषिक जाहीर, येत्या रविवारी कोल्हापुरात वितरण
By विश्वास पाटील | Published: February 7, 2024 05:08 PM2024-02-07T17:08:48+5:302024-02-07T17:09:45+5:30
कोल्हापूर : ओल्या कचर्याचं परिसरातच खत केलं आणि विभाग पातळीवर बायोगॅस तयार केला तर मिथेन या विषारी वायूचे प्रमाण ...
कोल्हापूर : ओल्या कचर्याचं परिसरातच खत केलं आणि विभाग पातळीवर बायोगॅस तयार केला तर मिथेन या विषारी वायूचे प्रमाण कमी होईल आणि वातावरणातील तापमान कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होईल हे सांगणार्या आणि मुंबईत ’परिसर भगिनी विकास संघटने’च्या साडेतीन हजार स्त्रियांचं नेतृत्व करणार्या वेगवेगळ्या इमारतींमध्ये जाऊन तेथील लोकांना सुक्या ओल्या कचर्याच्या विभागणीचे महत्त्व पटवून देणार्या कचरावेचक ते पर्यावरण रक्षक ठरलेल्या सुशीला साबळे यांची यंदाच्या कुसुम पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. 51 हजार रुपये, शाल, बोधचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
आंतरभारती शिक्षण मंडळाच्या पल्लवी कोरगावकर, सुचिता पडळकर, तनुजा शिपूरकर, विनय पाटगावकर यांनी बुधवारी ही घोषणा केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष सरोज पाटील यांच्या हस्ते रविवार, दि. 11 फेब्रुवारीला वसंतराव चौगले पतसंस्था हॉल, शाहूपुरी, कोल्हापूर येथे या पुरस्काराचे वितरण सकाळी 11 वाजता होईल. पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. प्रा. चंद्रकांत शंकर पाटगांवकर यांनी आयुष्यभर समतेचा विचार समाजामध्ये पोहोचवण्याचे कार्य केले. यांच्या मृत्युपश्चात आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्याकडे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची शिल्लक रक्कम सोपविली. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आदी क्षेत्रात हिरिरीने भाग घेणार्या महिलांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या हेतूने कुसुम पारितोषिक देण्यात येते. चंद्रकांत पाटगांवकर यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी ही रक्कम संस्थेकडे सुपूर्द केली. त्याच्या व्याजातून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे.
या अगोदर मेळघाटमध्ये वैद्यकीय सेवा व बालकांचे कुपोषण याच्यावर काम करणार्या डॉ. कविता सातव यांना, सार्वजनिक स्वच्छतागृहांची महिलांसाठी मागणी करणार्या आणि राईट टू पी साठी काम करणार्या मुमताज शेख, तसेच आर्थिकदृष्ट्या स्त्रियांना स्वावलंबी बनवून आत्मभान देणार्या कांचनताई परुळेकर, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महिलांची बँक काढलेल्या मेधा पुरव-सामंत, नर्मदा बचाव आंदोलनालासाठी काम करणार्या सुनीती सु. र., माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनोरुग्णांसाठी काम करणार्या डॉ. सुचेता धामणे, अनेक आजी-आजोबांना आई होऊन सांभाळणार्या डॉ. अपर्णा देशमुख, ट्रान्सजेंडर समूहाच्या प्रतिनिधी दिशा पिंकी शेख, ट्रकचालक, देहविक्रय करणार्या महिलांसाठी काम करणार्या सोलापूरच्या सिमा किणीकर यांना या अगोदरचे पुरस्कार दिले आहेत. या कार्यक्रमासाठी जरूर यावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.