पावसाच्या लहरीवरच ठरणार यंदाचा ऊस गाळप हंगाम

By विश्वास पाटील | Published: September 20, 2022 03:36 PM2022-09-20T15:36:48+5:302022-09-20T15:37:39+5:30

परतीचा पाऊस दसऱ्यामध्ये पडला तर हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो असे आजचे चित्र आहे.

This year's sugarcane crushing season of the sugar mills will depend on the rain | पावसाच्या लहरीवरच ठरणार यंदाचा ऊस गाळप हंगाम

संग्रहित फोटो

Next

विश्वास पाटील

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने यंदाचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी धुराडे कधी पेटणार, हे पावसाच्या स्थितीवरच ठरणार आहे. परतीचा पाऊस दसऱ्यामध्ये पडला तर हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो असे आजचे चित्र आहे.

यंदा दसरा ५ ऑक्टोबरला आहे. दिवाळी २४ ऑक्टोबरला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आजपासून पाऊस पूर्णत: पंधरा दिवस थांबला तरच १५ तारखेपासून हंगाम सुरू होईल अशी शेतीची स्थिती आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात शेतात पाणी आहे. अलीकडील काही वर्षांत दसऱ्यातही पाऊस होत आहे तसे झाल्यास जाहीर केलेल्या तारखेला कारखाने सुरू होण्यास अडचणी येतील असे दिसते. मराठवाड्यात पावसाची फारशी अडचण नाही परंतु तिथे कारखाने लवकर सुरू होत नाहीत. कारण तिथे आडसालीचे क्षेत्रच नसते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये गाळपासाठी त्यांना ऊसच उपलब्ध नसतो.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस परिषद यंदा १५ ऑक्टोबरलाच आहे. यंदा एकरकमी एफआरपी देण्याची बहुतांशी सर्वच कारखान्यांची तयारी आहे. कोल्हापुरात जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी तशी घोषणाच केली आहे; परंतु संघटनेने एकरकमी एफआरपीच्यावर टनाला किती देणार ते सांगा मगच उसाला हात लावा, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील हंगामावर होऊ शकतो.

यंदा पाऊस सरासरीएवढा झाला असला तरी कुठेच महापूर आलेला नाही. ऊसपिकाला लागेल तसाच पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या पिकांचे अजिबात नुकसान झालेलेे नाही. परिणामी यंदाही गाळप जास्त होणार आहे. त्यामुळे हंगाम वेळेत सुरू करणे व त्यानुसार गाळपाचे नियोजन करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.

चढ-उतार असेही..

साखर उद्योगातील जाणकारांच्या मते कोणत्याही कारखान्याचा १८० दिवसांचा हंगाम हा आर्थिकदृष्या योग्य मानला जातो. परंतु राज्यातील हंगामामध्ये त्यात बरेच चढ-उतार आहेत. गत हंगामात कोल्हापूर-१४४ दिवस, पुणे- १८०, सोलापूर-१७२, अहमदनगर-१८१,औरंगाबाद-१८८, नांदेड-१९१,अमरावती-१६६ आणि नागपूर विभागात १२४ दिवस हंगाम सुरू राहिला.

तीन जिल्ह्यांतच निम्मे गाळप

गतवर्षी सोलापूर, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात ५६९ लाख टन गाळप झाले होते. राज्यात एकूण १३२० लाख टन गाळप झाले आहे. या तिन्ही जिल्ह्यातील हंगाम १५ पासून सुरू होऊ शकतो. कारण तिथे ऊसही भरपूर आहे आणि पावसाचीही अडचण फारशी येत नाही. पाऊस झाला तरी जमिनी निचऱ्याच्या असल्याने तोडी सुरू करता येतात.

Web Title: This year's sugarcane crushing season of the sugar mills will depend on the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.