थोरातांच्या निवडीने ‘पी. एन.’ गटाला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:17 AM2019-07-15T01:17:26+5:302019-07-15T01:17:30+5:30
कोल्हापूर : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याने जिल्ह्यात प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या गटाला ...
कोल्हापूर : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याने जिल्ह्यात प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या गटाला बळ मिळाले आहे. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर गेले सहा वर्षे कॉँग्रेस पातळीवर पाटील गट काहीसा मागे पडल्यासारखा होता.
कॉँग्रेसमध्ये पूर्वीपासून दोन-तीन गट कार्यरत होते. तीच परंपरा अलिकडे कायम होती. विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह विदर्भातील नेत्यांचे गट कार्यरत होते. दिल्ली दरबारी मुख्यमंत्र्यांसह वजनदार मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी गटांचे लॉबिंग उपयोगी ठरते. कोल्हापूर जिल्ह्यातही गट कार्यरत आहेत. विलासराव देशमुख यांच्या गटातील प्रमुख शिलेदारांमध्ये बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, पी. एन. पाटील यांचा समावेश होता. ‘विलासरावांचे समर्थक’ म्हणून त्यांना आजही ओळखले जाते. देशमुख राज्य व केंद्रात सत्तेत असताना त्यांना मोठे पाठबळ मिळाले; पण २०१३ ला त्यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यानंतर देशमुख गट अडचणीत आला. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचे वर्चस्व कॉँग्रेसमध्ये निर्माण झाल्याने देशमुख समर्थकांची अनेकवेळा गोची झाली.
थोरात यांच्या निवडीने एका निष्ठावंताला संधी मिळाल्याने कॉँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य येण्यास मदत होईल. त्यांच्या निवडीने कोल्हापुरातही पक्षाला फायदा होईल. थोरात व पी. एन. पाटील यांचे कौटुंबिक संबंध आहेत; त्यामुळे पाटील यांच्या गटाला बळ मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांच्या कार्यकर्त्यांत चैतन्य पसरले आहे.
थोरात हे संयमी असून, सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे, त्याचा फायदा पक्ष बळकटीसाठी होऊ शकतो; पण पक्षांतर्गत गटबाजी संपविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. जिल्हा कॉँग्रेसमधील गटबाजी मोडून काढत विधानसभेला चांगले यश मिळविण्यासाठी थोरात ताकदीचा वापर कशा पद्धतीने करतात,
त्यावरच जिल्ह्णातील कॉँग्रेसचे यश अवलंबून आहे.
गटबाजी संपली तरच कॉँग्रेसचे निम्मे आमदार
जिल्ह्णातील गटबाजी संपली तर १0 पैकी किमान पाच जागा जिंकणे कॉँग्रेसला सहज शक्य आहे. पहिल्यांदा कॉँग्रेस नेत्यांना लोकसभा पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडून कॉँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.