१२० गुन्हेगारांची कसून चौकशी
By admin | Published: February 18, 2015 01:39 AM2015-02-18T01:39:32+5:302015-02-18T01:39:32+5:30
पानसरे हल्ला प्रकरण : सर्व स्तरावर तपास सुरू
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी १२० गुन्हेगारांची कसून चौकशी केली आहे. हा हल्ला सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक किंवा आर्थिक व्यवहारातून झाला आहे का? अशा वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरून पोलिसांचे एक विशेष पथक तपास करीत असून, त्या अनुषंगाने पोलिसांकडून या सर्व पातळ्यांवर माहिती घेतली जात असली तरी तपासाबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात येत आहे.
पानसरेंवरील हल्ला अन्य एखाद्या कारणातून झाला असला तरी तो दाभोलकरांच्या हल्ल्यातील आरोपींनीच केला, असे भासविण्याची हल्लेखोरांची मानसिकता असावी, असा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, मुंबई-पुणे येथून दहशतवादीविरोधी पथक, बॉम्बशोध व नाशक पथक, अग्निशस्त्र तज्ज्ञ आणि न्यायवैद्यक पथक (फॉरेन्सिक लॅब) अशा चार विशेष पथकांनी मंगळवारी पहाटे तीन ते सकाळी नऊपर्यंत घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरील माती परीक्षण, पानसरे यांच्या रक्ताचे नमुने, पुंगळ्या, आदींची तपासणी केली. प्रथमदर्शनी सापडलेल्या पाच पुंगळ्या हल्लेखोरांनी पॉइंट टूटू या गावठी रिव्हॉल्व्हरमधून झाडल्याचे निष्पन्न झाले.
मुंबई-पुण्याहून आलेल्या चार विशेष पथकांनी केलेल्या पाहणीमध्ये हल्लेखोरांनी पूर्वनियोजित कट रचून हा हल्ला केला असून, त्याबाबतचे कोणतेही पुरावे त्यांनी मागे सोडले नसल्याचे दिसून आले. वीस विशेष पथके या हल्ल्यातील मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी जिल्ह्यातील पिस्तूल तस्कर मनीष नागोरीसह आर. सी. गँग, एस. टी. गँग, आदी गुन्हेगारी टोळ्यांमधील १२० जणांकडे कसून चौकशी केली आहे. चौकशी करून त्यांना सोडून दिले असले तरी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचे पथकही नेमण्यात आले आहे. तसेच हल्ला झाल्यानंतर कोणता गुन्हेगार गायब झाला आहे का, याचीही माहिती पोलीस घेत आहेत.
पानसरेंच्या प्रकृतीत सुधारणा
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे उपचारास चांगला प्रतिसाद देत असल्याने ते यातून बाहेर पडतील, त्यांच्या पत्नी उमा यांची प्रकृती सुधारली असून त्या आता बोलू शकतात, अशी माहिती ‘अॅस्टर आधार’ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व स्त्रीरोग
तज्ज्ञ डॉ. उल्हास दामले यांनी मंगळवारी येथे दिली. हॉस्पिटलमध्ये सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डॉ. दामले यांनी मेडिकल बुलेटिनमध्ये पानसरे दाम्पत्याच्याप्रकृतीची माहिती दिली. डॉ. दामले म्हणाले, पानसरे यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर अतिदक्षता विभागात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.उपचारास ते चांगला प्रतिसाद देतात; परंतु पूर्णत: धोक्याबाहेर आले असे सांगण्यास अजून कांही तासांचा अवधी लागेल. ती प्रक्रिया सुरु आहे एवढे मात्र नक्की. दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना अजूनही वेदनाशामक औषधे व काही प्रमाणात गुंगीचे औषध दिले जात आहे. यामुळे पानसरे यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्याबाबत लगेचच काही सांगता येणार नाही. उमा पानसरे यांची प्रकृती सुधारत आहे. त्या आज, मंगळवारपासून बोलू लागल्या आहेत. आता त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही.या दाम्पत्याच्या प्रकृतीची प्रत्येक तासाला स्थिती पाहून उपचार केले जात आहेत. (प्रतिनिधी)