‘त्या’ आरोपांचा महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाकडून निषेध
By Admin | Published: March 25, 2015 10:09 PM2015-03-25T22:09:33+5:302015-03-26T00:10:59+5:30
समाजात फूट पाडणाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिंधुदुर्गनगरी : सांगली येथे झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ब्राह्मण समाजावर केल्या गेलेल्या आरोपांचा महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गने निषेध केला आहे.याबाबतचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सांगली येथील संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेच्या लोकांनी नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या घडवून आणल्या आहेत. आता तुम्हाला माफी नाही’ अशाप्रकारची वक्तव्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी करून ब्राह्मण समाजाला चिथावणी दिली आहे.
अनेक सामाजिक कार्यात ब्राह्मण समाज अग्रेसर असतो. बाबा आमटे, नरेंद्र दाभोळकर, अभय बंग या सर्वांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे व सदैव राहणार. परंतु संभाजी ब्रिगेडसारखी काही मंडळी प्रत्येक गोष्टीचे भांडवल करून ब्राह्मण समाजावर गरळ ओकण्याचा प्रयत्न करतात व नंतर निष्फळही होतात. अशा प्रवृत्तींचा महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे निषेध नोंदवला जात आहे.महाराष्ट्रात अनेक दलित हत्याकांड झालेली आहेत. या सर्व हत्याकांडाबद्दल प्रथमत: ब्राह्मण समाजावर आरोप करण्यात आले असून या सर्व हत्याकांडाच्या चौकशीअंती कोण दोषी आहे हे साऱ्या जगाला माहिती झाले आहे. हे केवळ समाजामध्ये फूट पाडण्याकरीता केलेले षड्यंत्र आहे. अशा प्रवृत्तींना वेळेवर सरकारने ठेचून काढणे गरजेचे आहे. अन्यथा देशाच्या एकतेला व विश्वासाला धोका पोहोचेल. यावेळी जिल्हाध्यक्ष नीलेश सरजोशी, उपाध्यक्षा नीलम जोशी, कार्यवाह गुरुनाथ दामले, प्रकाश कुंटे, राजाराम चिपळूणकर, सुहास गोगटे, विजयकुमार कात्रे, प्रसाद पंडित, अविनाश मणेरीकर, पुरुषोत्तम हर्डीकर, सुधाकर जोशी, भिकाजी गणपत्ये, विजयकुमार मराठे, आनंद पुराणिक, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)