अश्विनी बिद्रे हत्याकांड सुनावणी : लॅपटॉपमधील मारहाणीचे व्हिडीओ तेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 03:01 PM2019-11-02T15:01:39+5:302019-11-02T15:03:17+5:30
कोल्हापूर : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पनवेल न्यायालयात सुनावणी झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्यासमोर ...
कोल्हापूर : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पनवेलन्यायालयात सुनावणी झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्यासमोर लॅपटॉपमधील मारहाणीचे व्हिडीओ आणि आॅडीओ तेच आहेत, अशी माहिती अश्विनी यांचे भाऊ आनंद जयकुमार बिद्रे यांनी दिली. न्यायालयाने त्यांच्याकडून या पुराव्यांबाबत खात्री करून घेतली. पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला आहे.
बिद्रे हत्याप्रकरणाची पनवेल न्यायालयात न्यायाधीश अस्मर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत आणि अॅड. संतोष पवार यांनी युक्तिवाद करून बिद्रे हत्याकांडातील १३९ साक्षीदारांची यादी यापूर्वी सादर केली होती. त्या साक्षीदारांची तपासणी न्यायाधीश अस्मर यांच्यासमोर सुरू झाली आहे.
शुक्रवारी काही साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये अश्विनी यांचे भाऊ आनंद बिद्रे यांना न्यायालयाने इनकॅमेरा जबाब घेतला. पोलिसांनी जप्त केलेल्या लॅपटॉपमधील व्हिडीओ, आॅडीओ दाखविल्या. त्यातील मारहाण, धमकी देणे हे व्हिडीओ तेच आहेत का, की पोलिसांनी बदलले आहेत, अशी विचारणा करून खात्री करून घेतली.
यावेळी उच्च न्यायालयात दाखल रिटपिटीशन आणि मुख्यमंत्री, पोलीस महांसचालक, नवी मुंबई कमिशनर यांना तपासातील दिरंगाईबाबत केलेली निवदने रेकॉर्डवर घेतली. या गुन्ह्यातील संशयित आरोपी अभय कुरुंदकर, त्याचा मित्र राजेश पाटील, महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांची ओळख परेड झाली.
जप्त मुद्देमालाची सत्यता पडताळणी सुरू झाली आहे. अश्विनी यांची मुलगी सूची राजू गोरे हिची कस्टडी कोणाकडे आहे, याबाबत न्यायालयाने विचारणा केली होती. त्यामुळे मुलगी सूची न्यायालयासमोर हजर होती. सुनावणीला पोलीस अधीक्षक संगीता शिंदे-अल्फान्सो, संदीप वाघमोडे, सध्याचे तपास अधिकारी अजय कदम उपस्थित होते.