संस्था मोडणाऱ्यांनी पारदर्शकतेच्या गप्पा मारू नये
By admin | Published: May 1, 2015 12:27 AM2015-05-01T00:27:15+5:302015-05-01T00:31:37+5:30
एम. आर. पाटील : साडेसहा वर्षे कौतुक करणाऱ्यांना आता दोष कसे दिसले?
राजाराम लोंढे - कोल्हापूर -मागील पंचवार्षिकमध्ये ज्यांनी जिल्हा परिषद सोसायटीला कुलूप लागण्यासारखी अवस्था केली, तेच टोळके आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांना पारदर्शकतेच्या गप्पा कारण्याचा नैतिक अधिकार नाही. मूळ अंदाजपत्रकाशिवाय लिफ्टसह इतर खर्च वाढल्याने इमारतीचा खर्च वाढला; पण प्रत्येक गोेष्टीत ‘अर्थ’ शोधणाऱ्यांना सगळे पिवळेच वाटत असल्याचा पलटवार सोसायटीचे अध्यक्ष व महालक्ष्मी सहकार सत्तारूढ पॅनेलचे नेते एम. आर. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
पाटील म्हणाले, इमारतीच्या मूळ अंदाजपत्रकात नसलेला लिफ्ट, जनरेटर, विद्युतीकरण, संरक्षणभिंत, सुशोभीकरण, फर्निचर, आदी बाबींवर ८४ लाख खर्च झाल्याने इमारतीचा खर्च वाढला. वाढीव खर्चाला सर्वसाधारण सभा व संचालक मंडळ बैठकीत रितसर मान्यता घेतली. टोलेजंग इमारत उभी करताना प्रत्येक गोष्टीत काटकसर केली. इमारतीच्या विविध भाड्यापोटी वर्षाला ३२ लाख रुपये उत्पन्न आहे. खोडसाळपणाने आरोप करून चांगल्या संस्थेला बदनाम करण्याचे षङ्यंत्र काही मंडळी करत आहेत. सभासदांच्या पात्र मुलांना त्यांच्या गुणवत्तेनुसार कर्मचारी भरतीत संधी दिली. पारदर्शक काम केले म्हणूनच सातत्याने ‘अ’ वर्ग मिळाला.
संस्था बदनाम करणाऱ्यांना सभासदच उत्तर देतील
गेले साडेसहा वर्षे स्वत:च्या कुटुंबाप्रमाणे सोसायटीसाठी वेळ दिला. संचालक मंडळ, सुकाणू समिती, सभासद व ठेवीदारांच्या सहकार्याने डबघाईला आलेल्या संस्थेला ऊर्जितावस्थेत आणले. संस्थेच्या प्रगतीबाबत सर्वसाधारण सभेसह सर्वच कार्यक्रमांत सभासदांनी कौतुक केले. मंत्रिमहोदयांनी संचालकांच्या पाठीवर थाप मारली, एवढे करूनही केवळ विरोधाला विरोध म्हणून संस्थेची बदनामी करणाऱ्यांना सभासदांनीच चोख उत्तर द्यावे, असे भावनिक आवाहन एम. आर. पाटील यांनी केले.