विरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब, वेळ आली की फोडणार-राजेश क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:15 AM2019-05-10T11:15:23+5:302019-05-10T11:17:37+5:30
माझ्याकडेही विरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब आहेत. वेळ आली, की ते फोडणारच; पण जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाही त्यांच्या छाताडावर पाय ठेवून मी निवडून येणार, असा विश्वास गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर : मी शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा कट्टर कार्यकर्ता आहे. भ्रष्टाचार आणि गद्दारी माझ्या रक्तात नाही. पक्षाच्या आणि जनतेच्या विश्वासावर मी निवडून आलो. आता निवडणुकीच्या तोंडावर माझ्याविरोधात लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे, माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न होत आहे.
माझ्याकडेही विरोधकांच्या विरोधात एक हजार बॉम्ब आहेत. वेळ आली, की ते फोडणारच; पण जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाही त्यांच्या छाताडावर पाय ठेवून मी निवडून येणार, असा विश्वास गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवाद जुंपला आहे. यावर आमदार क्षीरसागर यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. युतीचा निर्णय झाला त्या दिवसापासून मी सगळे मतभेद विसरून लोकसभा उमेदवारासाठी प्रचारसभा, मेळावे, कोपरासभा घेऊन प्रचंड काम केले. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत विजय देवणे, प्रा. संजय मंडलिक यांना उत्तरमधून मताधिक्य मिळवून दिले आहे. यंदाही त्यांना २५ हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास आहे.
युती धर्मासाठी मी निकराने प्रचार केला आहे. आता राजकारण बदलत असलं, तरी कोणी कोणत्या थराला जायचं याचा विचार करून त्याने आपली नितिमत्ता ठरवावी. विरोधकांकडून जाणीवपूर्वक माझी बदनामी करून मला जनतेतून पाडण्याचा, तिकीट कापण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गोष्टींना मी भीक घालत नाही. या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवर मी वेळ आली की पक्षप्रमुखांच्या संमतीने पुराव्यासह उत्तर देईन आणि त्यांचे पितळ उघडे पाडेन.
युतीची सत्ता आली की मंत्रिपद ...
क्षीरसागर म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाच्या जोरावर मी दोनवेळा निवडून आलो. मी निवडून येतो त्यावेळीच जनतेसाठी काम सुरू करतो. त्यांच्यासाठी मी २४ तास उपलब्ध आहे; त्यामुळे मला निवडणुकीची भीती नाही. आता युती झाली आहे, त्यामुळे नेत्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. विधानसभेलाही युतीची सत्ता येईल आणि त्यावेळी मी मंत्रिपदी असेन.