बळ दे झुंजायाला! छावण्यांमध्ये १२ हजार जनावरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 05:49 AM2019-08-14T05:49:42+5:302019-08-14T05:49:56+5:30
देशभरात बासुंदीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुरुंदवाडकरांना आता पाण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
- समीर देशपांडे
कोल्हापूर : देशभरात बासुंदीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुरुंदवाडकरांना आता पाण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडलेल्या कुरुंदवाडसह शिरोळ तालुक्यातील ३५ हून अधिक गावांची अक्षरश: दैना उडाली आहे. ‘बळ दे झुंजायाला’ एवढीच आता पूरग्रस्तांची अपेक्षा आहे.
गेले आठवडाभर कृष्णा आणि पंचगंगेने अर्ध्या तालुक्यात थैमान घातले आहे. वर्षाचा पडणारा पाऊस दहा दिवसांत पडला. कुटवाड, कनवाड, कुरुंदवाड, हासूर, कवठेगुलंद, आलास, गौरवाड, राजापूर, राजापूरवाडी, शिरटी, खिद्रापूर ही गावं अजूनही पाण्याने वेढलेली आहेत. नृसिंहवाडीतील दत्त महाराजांच्या पादुकांची अन्यत्र प्रतिष्ठापना करावी लागली तर कोपेश्वराच्या प्राचीन मंदिरामुळं प्रसिद्धीला आलेलं खिद्रापूरही पाण्याखाली गेलं. ८0 हून अधिक छावण्यांमध्ये ३५ हजारांहून अधिक ग्रामस्थांना यावं लागलं आणि १२ हजारांहून अधिक जनावरांचीही सोय करावी लागली.
अनेक घरं दहा दहा दिवस पाण्याखाली आहेत. त्यामुळं पाणी ओसरल्यानंतर घरात जाताना पोटात गोळा येणार आहे. चिखलानं माखलेलं घर पुन्हा उभारावं लागणार आहे. पोरांची भिजलेली पुस्तक, वह््या नवीन आणाव्या लागणार आहेत. अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडणाऱ्यांना कपड्यांचीही चिंता आहे. उभं पीक पाण्याखाली त्यामुळं खायचं काय असाही प्रश्न आहे.
वायुदलाची कामगिरी
गेल्या चार दिवसामध्ये वायुदलाच्या हेलिकॉप्टरने ४0 टन जीवनावश्यक साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मोठी कामगिरी केली आहे.