राज्यातील हजारो पात्रताधारक सी.एच.बी. प्राध्यापक भरतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:23 AM2020-12-29T04:23:14+5:302020-12-29T04:23:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सरुड : महाराष्ट्र राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांत सुमारे ९५०० ( साडेनऊ हजार ) प्राध्यापकांच्या जागा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सरुड : महाराष्ट्र राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांत सुमारे ९५०० ( साडेनऊ हजार ) प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेवर येताच प्राध्यापकांच्या ऐंशी टक्के जागा भरण्याचे सुतोवाच केले असले तरी, त्यादृष्टीने अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी राज्यातील हजारो पात्रताधारक सी.एच.बी. प्राध्यापक नवीन भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. शंभर टक्के प्राध्यापक भरती करुन पात्रताधारक प्राध्यापकांना न्याय द्यावा, अशी मागणी सध्या पात्रताधारक सी.एच.बी. प्राध्यापकांतून होत आहे.
यावर्षी कोरोनामुळे सी.एच.बी. प्राध्यापकांच्या नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये मुलाखती झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना नियुक्ती मिळाली नाही .परिणामी हा प्राध्यापक वर्ग आर्थिक विवंचनेत आहे. ऑनलाइन वर्ग घेण्याच्या प्रक्रियेमध्येसुद्धा हे प्राध्यापक नियुक्ती नसल्या कारणाने तिथेही आपले काम करू शकत नाहीत. याचा अत्यंत दूरगामी परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे .
राज्य शासनाकडून २०१२ पासून महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बंद करण्यात आली होती. याचा जबर फटका नेट, सेट व पीएच.डी.धारक प्राध्यापकांना बसला आहे. यादरम्यान या धोरणाविरोधात पात्रधारक प्राध्यापकांनी सातत्याने आंदोलने केली. परंतु शासनाच्यावतीने त्यांना केवळ आश्वासनेच देण्यात आल्याचा आरोप या प्राध्यापकांतून होत आहे.
यावर्षी तर कोरोनामुळे सी.एच.बी. प्राध्यापकांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावरही याचा विपरित परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
चौकट
नेट,सेट व पीएच.डी.धारक पात्र प्राध्यापकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता राज्य सरकारने शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी. यावर्षी कोरोनामुळे सी.एच.बी. प्राध्यापकांची निवड प्रक्रिया न झाल्यामुळे सी.एच.बी. प्राध्यापकांना प्रचंड आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरी राज्य शासनाने यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा.
- प्रा. प्रकाश नाईक
- निमंत्रक, नेट, सेट व पीएच.डी.धारक सी.एच.बी. प्राध्यापक संघ, महाराष्ट्र