भोगावती नदीत हजारो मासे मेले
By admin | Published: February 6, 2015 01:01 AM2015-02-06T01:01:28+5:302015-02-06T01:03:29+5:30
रसायनमिश्रित पाण्याने प्रदूषण : रसायन कोणी सोडले हेच कळेना; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
कोल्हापूर / सडोली (खालसा) : ट्रॅक्टरद्वारे हळदी परिसरात ओतलेले रसायनमिश्रित पाणी भोगावती नदीत मिसळल्याने हळदी (ता. करवीर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक पाणी दूषित झाल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले. पाण्यावर मृत माशांचा खच लागला. मेलेले मासे गोळा करून नेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची झुंबड उडाली. गेल्या २२ डिसेंबरलाही असाच प्रकार होऊन हजारो मासे मेले होते; परंतु ते कशामुळे मेले, याचा शोध प्रदूषण नियंत्रण मंडळास आजपर्यंत लागलेला नाही. बुधवारीच उच्च न्यायालयाने पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यात सरकारी यंत्रणांना अपयश आल्याबद्दल फटकारले असतानाच भोगावती नदीचे प्रदूषण झाल्याने लोकांतूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. परंतु, प्रदूषण कशामुळे झाले हेच प्रदूषण नियंत्रण मंडळास समजत नाही, हीच खरी गंमत असल्याची टीका लोकांतून होत आहे.
हळदी (ता. करवीर) येथे बंधाऱ्यातील पाण्याला दुर्गंधी येऊन गेले दोन दिवस दूषित बनले. बुधवारी रात्रीपासून हजारो मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसल्याने गुरुवारी सकाळी बंधाऱ्यावर ते पाहण्यासाठी व पकडण्यासाठी गर्दी उसळली. काठीने व बंदुकीने मासे मारून लोकांनी ते घरी नेले. अनेकांनी पोत्यात भरून मासे नेले. ही माहिती प्रदूषण मंडळाला समजताच प्रदूषण मंडळाचे अधिकारी एस. एस. डोके व न्यायालयाने स्थापन केलेल्या ‘निरी’च्या पथकाने नदी व ओढ्याच्या पाण्याचे नमुने घेतले.
हळदी व कुर्डू परिसरातील अनेक शेतकरी रसायनमिश्रित पाण्याचे टँकर शेतात ओततात. हे रसायनमिश्रित पाणी ओढा व नदीत मिसळते. शेतकऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नदीचे पाणी दूषित होण्याचा प्रकार वारंवार होत आहे; पण प्रदूषण मंडळ मात्र कारवाईस विलंब करीत आहे.
टँकर कुणाचे व गेले कुठे...
गेल्या २२ डिसेंबरला जेव्हा असेच प्रदूषण झाले तेव्हा भोगावती कारखान्याच्या डिस्टिलरीतून तीन टँकर मळी बाहेर गेल्याची नोंद झाली होती; परंतु ते टँकर कुठे गेले याचा शोध आतापर्यंत लागलेला नाही. मळीमिश्रित पाणी शेतीला घातल्यावर मुरमाड जमिनीतील खडक फुटतो, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे ते असले विषारी पाणी शेतीला घालत असल्याचे पुढे आले आहे.
जिल्हाधिकारी काय करणार..?
उच्च न्यायालयाने पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्ती केली आहे. त्याचे जिल्हाधिकारी राजाराम माने हे देखील सदस्य आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचीही तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे प्रदूषित घटकांवर कारवाई करण्यासंदर्भात त्यांनीच आता आदेश देण्याची गरज आहे.
भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्यामुळे दूषित पाणी जादा दाबाने सोडल्याने हेच पाणी हळदी बंधाऱ्याच्या खाली गेल्यामुळे बंधाऱ्याखालील गावांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार आहेत.
पिण्याचा प्रश्न गंभीर
नदीत रसायनमिश्रित पाणी मिसळल्याने काठावरील कुरुकली, हळदी, देवाळे, कोथळी, कुरुकली गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. प्रदूषणाची तीव्रता कमी होण्यास तीन दिवस जातात. तोपर्यंत पाण्यासाठी वणवण करावी लागणार.
नदीपात्रातील पाण्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी चिपळूणला पाठविण्यात येतील. अहवाल प्राप्तीनंतर जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करू. प्रदूषण नेमके कशामुळे झाले व कुणी केले हे सांगणेच अवघड बनले.
- एस. एस. डोके, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
पंचगंगा नदीची मुख्य उपवाहिनी असलेल्या भोगावती नदीचे गुरुवारी मळीमिश्रित पाण्यामुळे पुन्हा प्रदूषण झाले. त्यामुळे माशांचा श्वास गुदमरल्याने हजारो मासे मेले. अनेक मासे आॅक्सिजनसाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तडफडत होते. ते पकडण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची हळदी (ता. करवीर) येथील बंधारा व नदी काठावर अक्षरक्ष: झुंबड उडाली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाण्याची तपासणी करून नमुने घेतले.