स्वच्छतेसाठी एकवटले हजारो हात
By admin | Published: February 6, 2015 12:18 AM2015-02-06T00:18:54+5:302015-02-06T00:46:08+5:30
उत्तूरमध्ये सुंदर गल्ली स्पर्धा : विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला ग्रामस्थांचाही हातभार
रवींद्र येसादे -उत्तूर -‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीप्रमाणे ‘स्वच्छ सुंदर माझा गाव’ हे अभियान शाळकरी मुलांनी राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शाळकरी मुलांबरोबर ग्रामस्थांनीही हिरीरीने पुढाकार घेऊन बेचाळीस गल्ल्यांची स्वच्छता केली. उत्तूर (ता. आजरा) या दहा हजार लोकवस्तीच्या गावानं जिल्ह्यासमोर वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर यांच्या संकल्पनेतून हा विचार पुढे आला. सर्व शाळांनी स्वच्छतेचा मुद्दा उचलून धरला. ग्रामपंचायतीने सहकार्य करण्याची ग्वाही दिली. प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. तीन बुधवारनंतर स्वच्छतेचा पहिला ठप्पा यशस्वी पार पडला.
प्रत्येक मंगळवारी सायंकाळी विद्यार्थ्यांबरोबर पालकही आपली गल्ली स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. तिसऱ्या परीक्षणात बेचाळीस गल्ल्या स्वच्छ झाल्या. परीक्षण होईपर्यंत साऱ्यांचे लक्ष स्वच्छता मोहिमेकडे होते. प्रत्येक गल्लीत वेगळेपण करण्याचा प्रयत्न केला जात होता. परीक्षण होईपर्यंत शाळकरी मुलांनी गल्लीतील मार्ग बंद केले होते. परीक्षणाबाबत पालक-विद्यार्थी यांच्यात उत्सुकता होती.
परीक्षणाच्या दरम्यान स्वच्छ सुंदर परिसराबाबत घोषवाक्ये, ओला सुका कचऱ्यासाठी पेटी, वृक्षारोपण, वृत्तपत्रे, पाणपोई, अंधश्रद्धा निर्मूलन, उद्बोधनपर वाक्ये, प्लास्टिक हटाव, पक्षी वाचवण्यासाठी घरटे आदींसह गल्लीत सारवण करून रांगोळी घातली होती.
प्लास्टिकमुक्तीसाठी ग्रामपंचायत आणि व्यापारी यांची बैठक घेणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्यावर स्वच्छतेचे नियोजन नाही. गटारींची अपवादात्मक गल्ल्यांनी स्वच्छता केली नाही. तेथे जनजागृती केली पाहिजे, अशा काही त्रुटीही परीक्षणांच्या वेळी निदर्शनास आणून दिल्या आहेत. या त्रुटींचेही निराकरण करण्यात येणार आहे.
संपूर्ण गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेला ग्रामस्थानींही दिलेली दाद वाखाणण्यासारखी आहे. यामध्ये सातत्य ठेवण्याचा निर्धार यानिमित्ताने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी केला आहे.