स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी हजारो हात हातात गुंफले
By Admin | Published: August 6, 2016 01:35 PM2016-08-06T13:35:46+5:302016-08-06T15:00:09+5:30
स्त्रीत्वाचा जागर करण्यासाठी ‘लोकमत’ तर्फे काढण्यात आलेल्या मानवी साखळीत कोल्हापूरकर मोठय़ा संख्येने सहभागी झाले
>‘लोकमत’च्या मानवी साखळी उस्फूर्त प्रतिसाद
साद मानवतेची, जागर स्त्रीत्वाचा..
कोल्हापूर, दि. 6 - स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी शनिवारी कोल्हापुरात हजारो हात हातात गुंफले. स्त्रीत्वाचा जागर करण्यासाठी ‘लोकमत’ तर्फे काढण्यात आलेल्या मानवी साखळीत कोल्हापूरकर मोठय़ा संख्येने सहभागी झाले. येथील भवानी मंडपात झालेल्या या उपक्रमात स्त्री-पुरुष, शाळकरी मुलांमुलींसह, महाविद्यालयीन तरुण-तरुणीही उस्फूर्तपणो सहभागी झाले.
कोपर्डी व राज्यात अन्य ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ‘लोकमत’ने ही मानवतेची साद घातली होती. त्यास समाजातून तितक्याच उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
निसर्गानेही त्यास मोलाची साथ दिली. गेली चार दिवस सुपाने ओतणारा पाऊस नेमका सकाळी सात वाजल्यापासून खडा मारल्यासारखा बंद झाला. उन्हाची कोवळी किरणे पसरली होती. त्यामुळे वातावरणात चैतन्य पसरले होते. तिथे सगळ्य़ांनी एकत्रित येवून स्त्रीचा सन्मान करण्याची शपथ घेतली. यानिमित्त आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले हिच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली.
या साखळीचे उदघाटन महापौर अश्विनी रामाणे, खासदार संभाजीराजे, मधुरिमाराजे, कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्र्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदिप देशपांडे, कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. के. दास यांच्या हस्ते झाले. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले व वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी या मानवी साखळीमागील भूमिका विशद केली. स्त्रियांवरील अत्याचाराचा आम्ही निषेध करतो व तिच्या सन्मानासाठी एक पाऊल पुढे टाकूया हे सांगण्यासाठीच हा उपक्रम घेतला असल्याचे भोसले यांनी सांगितले.