मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी हजारो ‘आशा’ ठाण्याला जाणार, मानधन वाढीबाबतचा आदेश काढण्याची मागणी करणार
By समीर देशपांडे | Published: February 7, 2024 04:33 PM2024-02-07T16:33:28+5:302024-02-07T16:35:44+5:30
परंतू सहा महिने झाले तरी अजूनही याबाबतचा शासन आदेश काढण्यात आलेला नाही
कोल्हापूर : गेले २५ दिवस मानधनवाढीच्या शासन आदेशासाठी संप करणाऱ्या ‘आशा’ कर्मचारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनी शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी ठाण्याला जाणार आहेत. एकीकडे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच तुम्ही आम्हांला मानधन वाढवण्याची घोषणा करून संप मागे घ्यायला लावलात. त्याचा शासन आदेश काढा अशी मागणीही करणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचे भरमा कांबळे, जिल्हा सचिव उज्ज्वला पाटील, राधिका घाटगे, संगीता पाटील, सारिका पाटील, विद्या जाधव, कविता पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उज्ज्वला पाटील म्हणाल्या, गेल्यावर्षी जेव्हा आम्ही मानधनवाढीसाठी आंदोलन केले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशांना ७ हजार तर गटप्रवर्तक यांना १० हजार रूपये मानधनवाढीची घोषणा केली. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन मागे घेतले.
परंतू सहा महिने झाले तरी अजूनही याबाबतचा शासन आदेश काढण्यात आलेला नाही. हा आदेश काढावा यासह अन्य मागण्यांसाठी आम्ही गेले २५ दिवस संपावर आहोत. परंतू अजूनही आमच्या मागण्यांची दखल शासनाने घेतलेली नाही. म्हणून ठाण्याला शिंदे यांच्या वाढदिवशी धडकण्याचा निर्णय आशांनी घेतला असून कोल्हापूर जिल्ह्यातून दोन हजार आशा कर्मचारी गुरूवारी ठाण्याला रवाना होणार आहेत. तेथे जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या धडकणार आहेत.