कोल्हापूर: हालसिद्धनाथ यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी, उद्या होणार भाकणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 05:23 PM2022-10-14T17:23:30+5:302022-10-14T17:23:54+5:30
पहाटेच्या नीरव शांततेत भाकणूक
म्हाकवे : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. चिक्कोडी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेला मंगळवारी प्रारंभ झाला. या यात्रेमध्ये भाकणुकीला विशेष महत्त्व असल्यामुळे सीमाभागातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली आहे. भाकणूक कथन करणाऱ्या भगवान ढोणे-वाघापुरे यांचे सुरूपली, सोनगे, बस्तवडे, आणूरसह म्हाकवे आदी गावांत उत्साहात स्वागत झाले.
वाघापूर येथून आप्पाचीवाडीकडे मार्गस्थ झालेल्या वाघापुरे यांचे गावागावांतील महिलांनी औक्षण केले. म्हाकवे येथील भाविकांनी गावच्या वेशीपासून ढोल-कैताळाच्या वादनात त्यांना हालसिद्धनाथ मंदिरात आणले. तेथे काही काळ स्थानापन्न होऊन सर्व भक्तांच्या समवेत पुन्हा त्यांनी रात्री उशिरा वाडीकडे प्रस्थान केले. ते आप्पाचीवाडी येथील गावच्या मसोबा मंदिरात थांबतात. रात्री १२ वाजल्यानंतर यात्रेतील मानकरी भाकणुकीसाठी त्यांना निमंत्रित करतात. त्यानंतर त्यांचे गावकरी व यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात येते. पहाटेच्या नीरव शांततेत या भाकणुकीला प्रारंभ होतो.
यात्रेचा आज मुख्य दिवस...
आज शुक्रवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. आज दिवसभरात महानैवेद्य दिला जातो. तसेच, रात्री ढोल-कैताळाच्या वादनाने जागर होईल, तर शनिवारी पहाटे दुसरी भाकणूक होऊन सायंकाळी चार वाजता पालखी सोहळा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.